अॅड. महेश मोहिते यांची मागणी
मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक पूल हे कमकुवत झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम खाते याकडे दुर्लक्ष करीत असून त्यांनी प्रथम मुरूड तालुक्यातील सर्व पुलांचे मजबुतीकरण करावे, अन्यथा भारतीय जनता पक्षाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी दिला.
अतिवृष्टी झाल्यानंतर अॅड. महेश मोहिते यांनी मुरूड तालुक्याचा दौरा करून सर्व परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाध्यक्ष मोहिते यांनी मुरूड तहसीलदारांना भेट देऊन घरात पाणी शिरलेल्या व शेतीचे नुकसान झालेल्या लोकांचे पंचनामे त्वरित करण्याची मागणी केली. या वेळी त्यांच्या समवेत भाजप तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, तालुका संघटन सरचिटणीस प्रवीण बैकर, महेश मानकर, शहर अध्यक्ष उमेश माळी, कृष्णा किंजले, अभिजित पानवलकर आदी उपस्थित होते.
यासंदर्भात जिल्हाध्यक्ष मोहिते यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते म्हणाले, मुरूड तालुक्यात एका दिवसात 475 मिलीमीटर एवढा पाऊस पडल्याने या तालुक्यात ढगफुटीच झाली आहे. निसर्ग चक्रीवादळ, त्यानंतर अवकाळी पाऊस व मुसळधार पाऊस यामुळे हा तालुका संकटाच्या खाईत कोसळला आहे. अतिवृष्टीमुळे या तालुक्यातील अनेक पूल हे कमकुवत झाले आहेत.
मुरुड तालुक्यातील वांदेली हा पूल केवळ सहा महिन्यापूर्वी बांधण्यात आला होता, परंतु एका दिवसाच्या पावसात तो वाहून गेला आहे. या गावाचा संपर्क तुटला आहे. सार्वजनिक बांधकाम अभियंते व ठेकेदार यांचे संगनमत असल्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. या पुलाच्या कामात दोषी असणार्या ठेकेदाराकडून पैसे वसूल करण्यात यावे, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी.
पूल निकामी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाला असताना सुद्धा बांधकाम खाते फारसी काळजी घेत नाहीत. विहूर पुलाच्या संरक्षण भिंतीचे काम 11 जुलैनंतर करून सुद्धा पुन्हा आज पडलेल्या पावसामुळे ही भिंत वाहून जाते म्हणजे हे काम कसे करतात ते लोकांना आता चांगलेच अवगत पडले आहे. चिकणी पूल हा सुद्धा कमकुवत आहे, परंतु प्रयेक वेळा दुर्लक्ष होत असल्यामुळे लवकरच बांधकाम खात्याच्याविरोधात आंदोलन पुकरणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.
विहूर येथील सरकारी गुरचरण जमिनींबाबत लोकांचे आंदोलन सुरू असून गरज पडल्यास भाजप लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. जिथे लोकांवर अन्याय होईल तिथे आम्ही लोकांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांच्यासमवेत लढणार असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले.