नगरसेविका नेत्रा पाटील यांची सिडकोकडे मागणी
खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर शहराच्या मध्यभागातून वाहणारे उघडे नाले बंदिस्त करण्याबाबतची मागणी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन केली आहे.
नगरसेविका पाटील यांनी सिडकोच्या अधिकारी वर्गाच्या निदर्शनास आणून दिले की, त्यांच्या प्रभागातील सेक्टर 20 व 21 मधील जलवायु-विहार समोरील नाला उघडा असल्याकारणाने या नाल्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचते. त्याचबरोबर बरीच घाण, कचरादेखील मोठ्या प्रमाणात या नाल्यात ठिकठिकाणी झालेला आहे. हा नाला उघडा असल्याकारणाने व तोच नाला पुढे शिल्प चौकातून ग्रीन फिंगर ग्लोबल स्कूलच्या समोरून पुढे जातो. त्यामुळे आजबाजूच्या सोसायटीतील रहिवाश्यांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीयुक्त श्वास घ्यावा लागतो. पावसाळा सुरू असल्याकारणाने नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे व गवतदेखील वाढलेले आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले असून परिसरात मलेरिया, डेंगू, थंडी-ताप इत्यादी आजरांचे रुग्ण वाढत आहेत. या नाल्याची त्वरित साफ-सफाई करून साथीच्या आजरांपासुन रहिवाश्यांची मुक्तता करावी. नाला बंदिस्त करावा यासाठी परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली आहे. त्यांना वर्षानुवर्ष या उघड्या नाल्याचा त्रास होत आहे.
दरवर्षी या ठिकाणी साचणार्या पाण्यामुळे नागरिक आजारी पडतात नाले बंदिस्ती केल्याने नागरिकांना होणारा त्रास बंद होईल. आपण रहिवाश्यांची मागणी लक्षात घेता हा नाला बंदिस्त करावा.