Breaking News

कोरोना प्रतिबंधक नियमांचे नवी मुंबईत उल्लंघन तीन बारवर दंडात्मक कारवाई

दीड लाखांचा दंड वसूूल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरू केली आहे. रात्री दहानंतरही व्यवसाय सुरू ठेवणार्‍या तीन बारवर कारवाई केली असून त्यांच्यावर प्रत्येकी 50 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात 404 जणांवर कारवाई केली असून दोन लाख 72 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

नवी मुंबईमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे, परंतु अनेक हॉटेल चालक रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या दक्षता पथकानेही कारवाई सुरू केली आहे. सेक्टर 19 मधील रेस्टॉरंट बारमध्ये रात्री 11 नंतरही ग्राहक असल्याचे निदर्शनास आले. कोपरखैरणे सेक्टर-9 मधील बार आणि बेलापूर सेक्टर-11 मधील हॉटेलवर छापा टाकला असता उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याचे निदर्शनास आले.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन झाले नाही तर रुग्णसंख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हॉटेल चालकांनी पहिल्यांदा नियम मोडल्यास 50 हजार रुपये दंड, दुसर्‍यांदा नियम मोडल्यास सात दिवसांकरिता आस्थापन बंद ठेवण्यात येणार असून तिसर्‍या वेळी नियम मोडल्यास कोरोना महामारी संपेपर्यंत हॉटेल बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

महानगरपालिका प्रशासनाने 10 ऑगस्ट 2020 पासून कोरोना नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई करण्यासाठी दक्षता पथक तयार केले आहे. या पथकाने वर्षभरात तब्बल 74286 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून तीन कोटी 91 लाख 7 हजार 100 रुपये दंड वसूल केला आहे.

पनवेलमध्ये हॉटेलवर कारवाई

पनवेल : तालुक्यातील डेरवली गावाच्या हद्दीत असलेल्या निसर्ग गार्डन हॉटेलवर पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. या ठिकाणी ग्राहक टेबलावर बसून गर्दी करून खाद्यपदार्थ सेवन करीत होते. तसेच त्यांना सर्व्हिस देणारे वेटर मास्क न लावता आणि सामाजिक अंतर न पाळता आढळून आले. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असल्याची जाणीव असतानादेखील हयगयीचे व निष्काळजीपणाचे कृत्य केले म्हणून हॉटेल कॅशर सुखरान गिरी (वय 34) व मॅनेजर युवराज शेळके (वय 26) यांच्याविरूद्ध कलम-188, 269, भा. दं. वि. साथ रोग प्रतिबंध अधिनियम कलम 2, 3 सह महाराष्ट्र शासन कोविड-19 2020चे कलम 11 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply