पनवेल : प्रतिनिधी
रेल्वेच्या प्रवासी सुविधा समितीचे चेअरमन खासदार पी. के. कृष्णदास यांच्यासह समितीचे सदस्य कैलाश वर्मा, डॉक्टर राजेंद्र फडके, उमा राणी, विभा अवस्थी व के. रविचंद्रन यांनी बुधवारी (दि. 27) सायंकाळी पनवेलच्या भाजप कार्यालयाला भेट दिली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा भेट देऊन स्वागत केले. त्याचबरोबर पनवेल रेल्वेस्टेशनवरील समस्यांबाबतचे निवेदन आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवासी सुविधा समितीला दिले. यापूर्वी रेल्वेच्या प्रवासी सुविधा समितीने पनवेल रेल्वे स्टेशनवरील सुविधांची पाहणी केली. या वेळी समितीने रेल्वेच्या अधिकार्यांना पनवेल रेल्वे स्टेशनवरील लोकलच्या फलाटावर लिफ्ट किंवा रॅम्प बसवण्याचे काम 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याची सूचना दिली. या लिफ्टमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला व रुग्णांचा पनवेल रेल्वे स्टेशनवर जिना चढून जाताना होणारा त्रास लवकरच कमी होईल, अशी अपेक्षा आहे. भाजप कार्यालयात या वेळी शहर अध्यक्ष जयंत पगडे, भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका वृषाली वाघमारे, रुचिता लोंढे, ओबीसी मोर्चाचे दशरथ म्हात्रे, नंदकुमार पटवर्धन, अमरीश मोकल आदी उपस्थित होते.