नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
मध्यंतरी वळवाचा पाऊस झाल्याने कांद्यासह सर्वच कृषीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यावेळी मुंबईच्या घाऊक बाजारात कांद्याचे दर 40 रुपये किलोपर्यंत पोहचले होते. एकंदरीत परिस्थिती पाहता कांद्याचे दर वाढणार हे गृहीत धरून बाजारातील आयातदार, व्यापार्यांनी इराणमधून कांदा मागवला होता. तो कांदा आता बंदरात पोहचला आहे आणि तिथून व्यापार्यांच्या गोदामामध्ये दाखल झाला आहे.
इराणचा कांदा आला असल्याने हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळेल, मात्र आपल्या देशी कांद्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नसल्याचा अंदाज व्यापारी वर्तवित आहेत. कांद्याचे 60 कंटेनर असून त्यापैकी 24 कंटेनर नवी मुंबईतील वेअर हाऊस, गोदामामध्ये आले आहेत आणि त्यांच्या छाननी, सफाईचे काम तिथे सुरू आहे.
एकूणच कांद्याचे दर वाढलेले असताना हा परदेशी कांदा मागवण्यात आला होता, मात्र हा कांदा आपल्याकडे पोहोचेपर्यंत कांद्याचे दर उतरून 20 ते 25 रुपये किलोवर आले आहेत. त्यामुळे नफा कमावण्याच्या उद्देशाने मागवलेला हा कांदा बाजारात पडून राहण्याची शक्यता आहे. त्याला हवा तसा उठाव मिळेल की नाही, याबाबत व्यापार्यांना शंका आहे. हा परदेशी कांदा चवीला गोडूस असल्याने घरगुती वापरासाठी त्याची खरेदी केली जात नाही. केवळ हॉटेलमध्ये वापरण्यासाठी त्याची खरेदी केली जाते. आता देशी कांद्याचे दर आवाक्यात आले असल्याने परदेशी कांद्याचे दर पडण्याची शक्यता व्यापारी मनोहर तोतलानी यांनी व्यक्त केली आहे.