Breaking News

सिडकोच्या विशेष गृहनिर्माण योजनेतील घरांची संगणकीय सोडत

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडको महामंडळाच्या कोविड योध्दे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध घरांसाठी सोमवारी (दि. 14) संगणकीय सोडत झाली. ज्या अर्जदारांना सोडतीमध्ये घर प्राप्त झाले नाही, परंतु योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या अर्जदारांनी अनामत रक्कम भरली होती अशा सर्व अर्जदारांना सोडत प्रक्रियेद्वारे सदनिका अदा करण्यात आल्या आहेत. यात प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांचादेखील समावेश करण्यात आला आहे.

सिडकोकडून कोविड योद्धे आणि गणवेषधारी कर्मचारी विशेष गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजने अंतर्गत नवी मुंबईच्या तळोजा, कळंबोली, खारघर, घणसोली आणि द्रोणागिरी या पाच नोडमध्ये एकूण 4,488 घरे (सदनिका) उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. एकूण 4,488 घरांपैकी 1088 घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर उर्वरित 3400 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता होती.

या योजनेची पहिली सोडत 29 ऑक्टोबर 2021 रोजी काढण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित घरांसाठी आणि अनामत रकमेचा भरणा केलेल्या परंतु ज्यांना अद्याप घर वाटपित  झालेले नाही अशा सर्व अर्जदारांकरिता दुसरी संगणकीय सोडत 15 नोव्हेंबर 2021 रोजी काढण्यात आली. दुसर्‍या सोडतीमध्ये प्रतीक्षा यादीतील उर्वरित सर्व अर्जदारांना घर वाटपित करण्यात आले आहे. या सोडतीमध्ये अर्जदारांनी ज्या ठिकाणास प्राधान्य दिले आहे त्या पेक्षा वेगळ्या ठिकाणचे घर त्यांना वाटपित करण्यात आलेले असू शकते. सदनिकांचा स्वीकार करण्यासाठी अर्जदारांना 15 दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. सदनिका स्वीकारणे अर्जदारास बंधनकारक असणार नाही. सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या नावांची यादी ही https://lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या सोडतीच्या माध्यमातून ’प्रत्येक अर्जदारास घर’ या सिडकोने दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यात आली, असे सिडकोच एमडी डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply