पनवेल : रामप्रहर वृत्त
गेल्या महिन्याभरात पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये 77,623 संशयितांची कोरोना चाचणी केल्यानंतर 658 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. तर उपचारांदरम्यान महिन्याभरात कोरोनामुळे 15 जणांचा मृत्यू झाल्यांची नोंद पालिकेच्या आरोग्य विभागाकडे आहे. या आकडेवारीमुळे पालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोनामुळे मृतांची संख्या 1363 वर पोहचली आहे. पालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही दिलासा देणारे म्हणजे 97.84 टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक बरे होणारे 98.68 टक्के रुग्ण हे खारघर वसाहतीमधील आहेत. गेल्या महिन्यात 22 ऑक्टोबर या दिवशी 34 रुग्ण आढळले होते. तर 22 नोव्हेंबरला आठ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. गेल्या महिन्यात 22 ऑक्टोबरला पालिका क्षेत्रात विविध रुग्णालय व घरी उपचार घेणारे 334 रुग्ण होते. तर 22 नोव्हेंबर या दिवशी 110 रुग्ण संपूर्ण पालिका क्षेत्रात उपचार घेत आहेत. पालिकेने गेल्या महिन्यात 77,623 जणांची कोरोना चाचणी केली असून पालिकेने 10 लाख कोरोना चाचण्यांचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या महिन्यापासून आतापर्यंत पालिका क्षेत्रातील 865 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, नागरिकांनी कोरोनामुक्त शहरासाठी पालिकेच्या कोरोना चाचणी मोहिमेत साथ द्यावी, असे आवाहन पनवेल पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी यापूर्वी अनेकदा केले आहे.