खोपोली : प्रतिनिधी
खालापुरातून पाण्याचा टँकर चोरून नेणार्या चौकडीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नेवासा अहमदनगर येथून जेरबंद केले आहे. 10 नोव्हेंबर रोजी पाण्याचा टँकर चोरी झाल्याबाबत फिर्याद टँकर मालकाने खोपोली पोलीस ठाण्यात दिली होती. गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता. गुन्हा घडला ठिकाणी घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता चोरी गेलेला टँकर अहमदनगरच्या बाजूला गेलेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महेश कदम, पोलीस हवालदार राजा पाटील, यशवंत झेमसे, प्रतीक सावंत, पोलीस नाईक राकेश म्हात्रे, देवराम कोरम यांच्या पथकाने खबर्याच्या मदतीने अहमदनगर गाठले.
टँकर चोरणारे आरोपी सचिन पोपट फुलारी (वय 29 रा. भेंडा बु. ता. नेवासा), महेश हरिचंद्र भेंडेकर (वय 23, रा. भक्तरपूर, ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर), संदीप सर्जेराव जाधव (वय 29, रा. भक्तरपूर, ता. नेवासा, जिल्हा अहमदनगर), रोहिदास देविदास शिंदे (वय 32, रा. मांडवे (तिसगाव) ता. नेवासा जि. अहमदनगर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी टँकर चोरीची कबुली दिली. चोरीला गेलेला पाण्याचा टँकर जप्त करण्यात आला आहे.