पनवेल : वार्ताहर
एका सहा वर्षीय मुलाचे त्याच्याच नात्यातील माणसांनी लग्नाला विरोध केला म्हणून अपहरण केले होते, परंतु खांदेश्वर पोलिसांनी अवघ्या चार तासांत या मुलाला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन येथून अपहरणकर्त्यांकडून त्याची सुटका केली. तक्रारदार विनय गामा सिंग (वय 39, रा. विचूंबे) यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, त्यांची पत्नी पिंकी सिंग यांच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तीने फोन करून व एसएमएसद्वारे धमकी दिली की, त्यांचा मुलगा यश (वय 6, नाव बदललेले आहे.) व त्यांची भाची (वय 21) हे आमच्या ताब्यात असून दहा लाख रुपये घेऊन मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथे या, अन्यथा दोघांनाही ठार करू. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांचे पथक बांद्रा टर्मिनल येथे रवाना झाले. यावेळी सखोल तपास केला असता त्यांनी आरोपी विपीन हिरालाल अग्रहरी (वय 21) याला ताब्यात घेतले. पोलिसांनी मुलगा व भाचीबद्दल विचारले असता धक्कादायक माहिती समोर आली. विपीन अग्रहरी यानेच सहा महिन्यांपूर्वी जिच्याबरोबर लग्न केले होते तीनेच आपल्या मामाच्या मुलाचे अपहरण केले होते. अधिक चौकशीमध्ये त्या दोघांच्या लग्नाला मामाचा विरोध होता. यामुळे मामाला धडा शिकविण्यासाठी त्यांनी मामाच्या मुलाचे अपहरण करून त्यांच्याकडे 10 लाख रुपयाची खंडणी मागितली होती. या मुलाला घेवून उत्तरप्रदेशला पळून जाणार होते. या कट त्यांनी उत्तरप्रदेशला सुल्तानपुर येथे रचला होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे हा कट उघडकीस आला. याकामी रेल्वे पोलिसांनीसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावली.