ग्रामस्थांनी केली सिडकोच्या अधिकार्यांसोबत पाहणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
गव्हाण आणि न्हावा ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक तीव्र पाणीटंचाईने त्रस्त झालेत. दास्तानफाटा ते गव्हाण या पाण्याच्या पाइपलाइनमधून अनधिकृतपणे पाण्याचे कनेक्शन घेतल्याने या गावांना गेल्या 20 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नव्हता. या विरोधात गुरुवारी (दि. 25) नागरिकांनी दास्तान फाटा येथे सिडकोच्या अधिकार्यांसोबत पाहणी करत पाणी चोरीची घटना उघडकीस आणली. या वेळी ग्रामस्थांचा आक्रोश पाहता लवकरात लवकर या समस्येवर मार्ग काढून पाणी चोरी करणार्यांवर कारवाई करून पाणी पुरवठा सुरळीत करणार असल्याचे आश्वासन सिडको अधिकार्यानी दिले.
गव्हाण आणि न्हावा ग्रामपंचायत हद्दीतील बेलपाडा, गव्हाण, कोपर, शेलघर, शिवाजीनगर, न्हावाखाडी, न्हावा या परिसरात गेल्या 20 दिवसांपासून येथील नागरिकांना तीव्र पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लगत आहे. दास्तानफाटा ते गव्हाण या पाण्याच्या पाइपलाइनमधून कंटेनर यार्ड, वेअर हाऊस, सर्व्हिस सेंटर यांनी अनाधिकृतपणे पाण्याचे कनेक्शन घेतल्याने या गावांना गेल्या 20 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नव्हता. गेली अनेक दिवस येथील नागरीक गव्हाण आणि न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी या संदर्भात सिडको तसेच ओएनजीसी अधिकार्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला, परंतु कोणताही तोडगा न निघल्याने गुरुवारी सिडकोेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. जी. पांडुळे यांच्यासोबत पाहणी केली. या वेळी या परिसरात असलेल्या लॉजीस्टीक, यार्ड, सर्व्हीस सेंटर हे पाणी चोरी करत असल्याचे समोर आले.
या वेळी ग्रामस्थांचा आक्रोश पाहता लवकरात लवकर या समस्येवर मार्ग काढून पाणी चोरी करणार्यांवर कारवाई करून पाणी पुरवठा सुरळीत करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच अनधिकृतपणे कनेक्शन तोडणार्यांना समज दिली जाईल व पुढे अशी घटना घडली तर गुन्हा दाखल करणार असल्याचे सिडको अधिकार्यांनी सांगितले.
या वेळी न्हावा ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, गव्हाणच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, सदस्य सचिन घरत, हेमंत पाटील, अरुण कोळी, कामिनी कोळी,उषा देशमुख, सुनिता घरत, रोशन म्हात्रे, भाजप नेते ज्येष्ठ नेते वामन म्हात्रे, न्हावा ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, प्रल्हाद पाटील, अमृता पाटील, कल्पना घरत, निर्मला ठाकूर, साधना तांडेल, शांता म्हात्रे, विजय ठाकूर, मिनाक्षी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
…अन्यथा आंदोलन करू -वामन म्हात्रे
गेल्या काही दिवसांपासून अधिकार्यांना सातत्याने तक्रार करुनही या समस्येवर तोडगा निघत नाही आहे. त्यामुळे सिडकोने या पाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर मार्ग काढला नाही तर आंदोलन करणार असल्याचा ईशारा भाजप नेते वामन म्हात्रे यांनी दिला.
RamPrahar – The Panvel Daily Paper