कर्जत : बातमीदार
येथील रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या रेस्क्यू टीमने जुलै महिन्यातील महापुरात बजावलेल्या शोध व बचावकार्याची दखल घेऊन कर्जत नगर परिषद आणि पोलीस ठाण्याच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. 15) या रेस्क्यू टीम सदस्यांचा सन्मान करण्यात आला. अतिवृष्टीमुळे आलेल्या आपत्तीमध्ये मंडळाच्या रेस्क्यू टीम सदस्यांनी कर्जत तालुक्यातील व्यक्तींना पुराच्या पाण्यातून सुरक्षितरीत्या बाहेर काढले. याचबरोबर काही व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेले होते, अशा व्यक्तींचा शोध घेण्याचेही कार्य केले. महाड येथील तळीये गावात जाऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल व ठाणे आपत्ती प्रतिसाद दल यांना सहकार्य केले. याचबरोबर महाड नियंत्रण कक्ष येथे वायरलेसद्वारे तळीये, जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथे समन्वय साधण्याचे कार्य केले. रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या चार सदस्यांनी अंडर वॉटर रेस्क्यूचे प्रशिक्षण घेतले आहे. या स्कूबा डायविंग पद्धतीचा वापर करून रेस्क्यू टीमचे सुमित गुरव, प्रसाद गिरी व इतर सदस्यांनी 5 ऑगस्ट रोजी पोशीर येथे बुडालेल्या एका व्यक्तीचा शोध घेण्याचे दोन दिवस प्रयत्न केले. या कार्याची दखल घेऊन मंडळाच्या रेस्क्यू टीमचे सदस्य अक्षय गुप्ता, अभिजित मोरबेकर, सुमित गुरव, प्रसाद गिरी आणि अमित गुरव यांचा स्वातंत्र्य दिनी गौरव करण्यात आला. या सन्मान सोहळ्यास कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी पंकज पाटील, पोलीस निरीक्षक अरुण भोर उपस्थित होते.