मुंबई : प्रतिनिधी
ग्रेस फिटनेसच्या भास्कर कांबळीने एकापेक्षा एक अशा सरस असलेल्या खेळाडूंवर सहज मात करीत मुंबई महानगरपालिकेचा पुरस्कार लाभलेल्या प्रतिष्ठेच्या मुंबई महापौर श्री 2019वर आपले नाव कोरले. बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन, उपनगर बॉडीबिल्डींग आणि फिटनेस असोसिएशन यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
कांदिवली येथील श्याम सत्संग भवन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत मुंबई व उपनगरातील खेळाडू मोठ्या संख्येने उतरले होते. प्रत्येक गटात 10 ते 15 स्पर्धक असल्यामुळे अव्वल सहा खेळाडू निवडताना परीक्षकांना बारकाईने निरीक्षण करावे लागले. 55 किलो वजनी गटात ओंकार आंबोकर, संजय आंग्रे आणि इम्रान खान यांच्यात अव्वल स्थानासाठी चुरस झाली. त्यात ओंकार काकणभर सरस ठरला. 60 किलो वजनी गटात नितीन शिगवणने दिलदार हुसेन आणि महेश कांबळेचे कडवे आव्हान मोडीत काढले; तर 65 किलो वजनी गटातही जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. या गटात देवचंद गावडेने पहिला क्रमांक पटकावला.
70 किलो गटात नदीम अन्सारी, तर 75 किलो गटात मनोज कोरेने बाजी मारली. शेवटच्या गटात भास्कर कांबळीला माजी मुंबई श्री सचिन डोगरे आणि यंदाचा मुंबई श्रीचा उपविजेता सकिंदर सिंगला या स्पर्धेत दुसर्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर यांची उपस्थिती लाभली; तर स्पर्धेचा पुरस्कार सोहळा आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते झाला. या वेळी संघटनेचे सरचिटणीस सुनील शेगडे, विजय झगडे, सुधाकर सुर्वे उपस्थित होते.