कोरोना नियमांचे उल्लंघन भोवले
नवी मुंबई : बातमीदार
कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन योग्य प्रकारे होत असल्याबाबत सतर्क राहण्याचे आदेश सर्व विभागांच्या सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांना दिलेले आहेत. त्यानुसार लग्न समारंभ, बार व रेस्टॉरंट अशा तीन ठिकाणी कारवाई करीत कोविड प्रतिबंधात्मक नियमाच्या उल्लंघनापोटी प्रत्येकी 50 हजार रुपये प्रमाणे एकूण एक लाख 50 हजार इतका दंड वसूल करण्यात आला.
विभाग कार्यालय स्तरावरील दक्षता पथके अधिक कृतीशील झाली असून त्याबरोबरीनेच मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथकेही कोविड नियमांचे पालन होत आहे अथवा नाही याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे ज्याठिकाणी कोविड प्रतिबंधात्मक नियमावलीचे उल्लंघन होताना आढळते तेथे दक्षता पथकांमार्फत दंडात्मक कारवाई केली जात आहे. अशाप्रकारे मुख्यालय स्तरावरील विशेष दक्षता पथकांनी कारवाई करीत एक लाख 50 हजार इतका दंड वसूल केला आहे. यामध्ये कोपरखरैणे येथील एक बार रात्री 12 नंतरही सुरू असल्याचे आढळल्याने कारवाई करीत 50 हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे. त्याचप्रमाणे सीबीडी बेलापूर येथील एका हॉटेलमधील लग्न समारंभाठिकाणी सभागृहाच्या क्षमतेच्या 50 टक्केपेक्षा अधिक लोकांची उपस्थिती आढळल्याने 50 हजार रुपये दंड वसूल केलेला आहे. तसेच तुर्भे येथील एका हॉटेलमध्ये क्षमतेच्या 50 टक्केपेक्षा अधिक ग्राहक आढळल्याने 50 हजार रुपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे.