Breaking News

15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नवी मुंबई पालिका सज्ज

पनवेल : वार्ताहर

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेऊन कोविड व्हेरिएंटचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी येत्या 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे.

याअनुषंगाने महापालिकेमार्फत लसीकरणाचे नियोजन करण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी तातडीने बैठक घेत या लसीकरणासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. या वेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कटके उपस्थित होते.

पंतप्रधानांनी 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हीड लसीचा पहिला डोस तसेच दोन्ही डोस घेतलेल्या आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच सहव्याधी असणारे 60 वर्षावरील नागरिक यांना प्रतिबंधात्मक डोस देण्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आयुक्त बांगर यांनी लसीकरणाचा आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागाची विशेष बैठक घेतली. या वेळी आयुक्त बांगर यांनी उर्वरित नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करून घेण्यावर भर देण्याचे तसेच नव्याने समाविष्ट होणार्‍या 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी पहिला डोस, त्याचप्रमाणे दोन्ही डोस पूर्ण झालेले आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे आणि सहव्याधी असणारे 60 वर्षांवरील नागरिक यांना प्रतिबंधात्मक डोस देण्याबाबत नवीन सेंटर्स सुरू करण्याचे नियोजन करण्याबाबत निर्देश दिले. त्यासोबतच सोसायट्यांमध्ये जाऊनही लसीकरण करण्याचा आराखडा तयार करण्याबाबत सूचना दिल्या.

सध्या कार्यान्वित नसलेल्या कोविड केअर सेंटर्सचाही उपयोग लसीकरणासाठी करण्याबाबत विचार करण्याचे आयुक्तांनी या वेळी सूचित केले. 15 ते 18 वयोगटातील लसीकरणासाठी शाळांमध्ये लसीकरणाची पथके पाठवून लसीकरण करण्याबाबत सांगोपांग विचार करावा व नियोजन करावे असे आयुक्तांनी निर्देश दिले. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात असून नागरिकांनीही विहित वेळेत लसीकरण करून घ्यावे तसेच लसीकरण झाल्यानंतरही मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

आतापर्यंत 85 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण

नवी मुंबई महापालिकेने जलद गतीने लसीकरण पूर्ण करण्याकडे कोविड सेंटर्स संख्येत 101 पर्यंत वाढ करून सुरुवातीपासूनच काटेकोरपणे लक्ष दिल्याने 18 वर्षांवरील 100 टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस पूर्ण करणारी नवी मुंबई ही एमएमआर क्षेत्रातील पहिली महापालिका ठरली आहे. त्यानंतर दुसर्‍या डोसच्या पूर्णत्वाकडेही महापालिकेने विशेष लक्ष देऊन 85 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply