गुन्हे शाखा कक्ष 3ची धडक कारवाई
पनवेल : वार्ताहर
गुन्हे शाखा कक्ष 3 पनवेलच्या पथकाने धडक कारवाई करीत तालुक्यातील नेरे वाजे रोडवर एका व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 50 लाखांचा मेथ्यॉक्युलॉन पावडर (एमडी) हा अंमली पदार्थ तसेच सोबत त्याच्याकडे असलेली मारुती गाडी, मोबाइल फोन व रोख रक्कम असा मिळून जवळपास 53 लाख 71 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तालुक्यातील शंकर मंदिर समोरील पिंपळाच्या झाडाजवळ नेरे-वाजे रोडवर एक व्यक्ती एमडी हा अंमली पदार्थ घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष 3चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्यासह पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र दौंडकर, बी. एस. सय्यद, पराग सोनावणे, सहाय्यक निरीक्षक तुकाराम कोरडे, सागर पवार, उपनिरीक्षक विजय शिंगे, हवालदार रवींद्र कोळी आदींच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून आरोपी कलीम रफिक खामकर (39 रा.भुसार मोहल्ला, पनवेल) याला ताब्यात घेतले.
आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे असलेल्या एका प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये 50 लाखांचा एमडी हा अंमली पदार्थ तसेच सोबत त्याच्याकडे असलेली मारुती गाडी, मोबाइल फोन व रोख रक्कम असा मिळून जवळपास 53 लाख 71 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.