रोहे : प्रतिनिधी
तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असलेल्या वालाच्या पिकाचे अवकाळी पडलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे रोहा तालुक्यात या वर्षी वालाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत वाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खवय्ये वालाच्या प्रतीक्षेत आहेत. भातशेतीनंतर रोहा तालुक्यात कडधान्याची लागवड केली जाते. वाल, तूर, मूग, हरभरा, चवळी आदी कडधान्यांची लागवड केली जाते. या पिकांमध्ये सर्वात कमी खर्चिक वालाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. दरवर्षी पोपटीसाठी वालाला मोठी मागणी असते. रोहा तालुक्यात या वर्षी सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावर वालाची लागवड करण्यात आली आहे. वाल पीक बहरत असताना दोन वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वालाचे नुकसान झाले आहे. वरकस भागातील वाल चांगले आले असून खोलगट भागातील वालाचे मोठे नुकसान झाले आहे. खोलगट भागात पाणी साचल्याने वाल कुजले आहेत. येत्या 15 ते 20 दिवसांत वालाचे पीक तयार होणार आहे. सध्या पुणे व अन्य ठिकाणाहून रोह्याच्या बाजारात वालाच्या शेंगा येत आहेत, परंतु तालुक्यातील वाल अधिक रुचकर असल्याने पोपटी खवय्ये स्थानिक वालाच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र वालाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी महादेव करे यांनी दिली.