नागरिकांत भीती, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले
माणगाव : प्रतिनिधी
काळ नदीवरील कोशिंबळे धरणातील पाण्यावर सध्या केमिकल सदृश तवंग आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. निजामपूर शहराला होणारा पाणीपुरवठा काळ नदीवर उभारण्यात आलेल्या पाणीयोजनेतून केला जातो. या पाणी योजनेपासून काही अंतरावर कोशिंबळे गावाजवळ काळ नदीवर धरण बांधलेले आहे. त्या धरणाचे पाणी धरणाला गळती असल्याने पुढे काळ नदीतून निजामपूरला होणार्या पाणीपुरवठा योजनेकडे जाते. त्या पाण्यावर केमिकल सदृश तवंग आढळला आहे.
याची माहिती मिळताच निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे, सदस्य प्रसाद गुरव, ग्रामविकास अधिकारी विशाल पाटणे यांनी तत्काळ कोशिंबळे धरणावर जाऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी तातडीने या पाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले आहेत. कोशिंबळे धरणातील पाण्यावर केमिकलयुक्त तवंग आढल्याने ग्रामस्थांतून एकच खळबळ उडाली आहे.
कोशिंबळे गावाजवळ काळ नदीवर शासनाने धरण उभारून अनेक वर्ष झाली. या काळ नदीतून आजही पाणी वाहत असून या धरणात हे पाणी साठते. त्या धरणाला पाझर व गळती असल्याने हे पाणी पुढे निजामपूरला केलेल्या विरोधा येथील पाणीपुरवठा योजनेतून होते. कोशिंबळे धरणातील पाण्यावर अचानक केमिकलयुक्त तवंग आल्याने हे नेमके कशाचे आहेत, याबाबत नागरिकांत संभ्रम असून या काळ नदीने येणारे पाणी पोस्को कंपनीचे दूषित पाणी असल्याची चर्चा ग्रामस्थांत आहे.
सहा महिन्यांपूर्वी पावसाळ्यात पोस्को स्टील कंपनीने रस्त्याकडेला टँकर उभा करून दूषित पाणी सोडले होते. त्याबाबत माणगाव पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल आहे. हे केमिकल सदृश पाणी त्याच नदीतून आले असावे, अशी चर्चा ग्रामस्थांतून बोलताना व्यक्त होत असून नेमके कारण समजले नाही. रवाळजे पॉवर हाऊसमधून विळे-भागाड एमआयडीसीला केलेल्या पाणीपुरवठा योजनेतून शुद्ध पाणी मिळते. तेच शुद्ध पाणी निजामपूर ग्रामपंचायतीला मिळावे. जेणेकरून निजामपूरचे दरवर्षीचे पाणीटंचाईचे संकट दूर होईल व ग्रामस्थांना मुबलक व शुद्ध पाणी मिळेल, अशी मागणी निजामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच राजाभाऊ रणपिसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.