Breaking News

कोकण कृषी विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेत समन्वयाची गरज -डॉ. अजय कोहली

कर्जतमध्ये राज्य वार्षिक भात गटचर्चा

कर्जत : बातमीदार

सर्वसामान्य शेतकर्‍यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावणे हे शास्त्रज्ञाचे ध्येय असले पाहिजे. सामान्य व्यक्ती आपल्या आहारात अन्न म्हणून प्रामुख्याने ज्या भात जाती वापरतात त्या विकसित करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे उपमहासंचालक डॉ. अजय कोहली यांनी नुकतेच कर्जत येथे केले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात महाराष्ट्र राज्य वार्षिक भात गटचर्चा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजय कोहली बोलत होते. भाताच्या सुधारासाठी कोकण कृषी विद्यापीठ व आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था यांच्यात समन्वयाची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

भात उत्पादकांनी फक्त वाणनिर्मिती न करता त्या विषयी जागरूकताही निर्माण करायला हवी, असे मत आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे सल्लागार डॉ. उमाशंकर सिंग यांनी व्यक्त केले. भात विशेषज्ज्ञ डॉ. भरत वाघमोडे यांनी प्रास्ताविकात देशातील भात सद्यस्थिती, समस्या व आव्हाने यावर सादरीकरण केले व महाराष्ट्रातील भात संशोधनाचा आढावा घेतला.

भातशेती शाश्वत व फायदेशीर होण्यासाठी सर्व शास्त्रज्ञांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी केले. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी भात शेतीत यांत्रिकीकरणावर जोर देत सेंद्रिय शेतीला प्रतिसाद देणार्‍या जाती विकसित करण्याचा सल्ला विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे यांनी यावेळी दूरदृश्यप्रणालीद्वारे दिला. कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, सहयोगी संशोधक संचालक डॉ. शिवराम भगत यांनीही मनोगत व्यक्त केले.

विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विद्यापीठाचे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. रमेश कुणकेरकर, कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आनंद नरंगलकर, जैवतंत्रज्ञान विभाग प्रभारी डॉ. संतोष सावर्डेकर, शिरगाव कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी डॉ. विजय दळवी, पनवेल खारजमीन शास्त्रज्ज्ञ डॉ. किशोर वैद्य, डॉ. मनीष कस्तुरे हे व्यक्तिश: तर महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठातील 35 अधिकारी व भात शास्त्रज्ज्ञ दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते. सहाय्यक भात विशेषज्ञ डॉ. प्रवीण वनवे यांनी आभार मानले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply