महिला व ग्रामस्थांचा विरोध
पाली : प्रतिनिधी
विहिरीजवळ स्मशानभूमी बांधण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या स्मशानभूमीला मिळखतखार मळा, सारळ व म्हाप्रोली ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. पाणी हे जीवन आहे. पाणी नाही तर जगणेही मुश्कील असे असताना आजही रायगड जिल्ह्यातील अनेक गावे, वाड्या-वस्त्या, पिण्याच्या पाण्यासाठी वर्षानुवर्षे धडपडताना, संघर्ष करताना दिसत आहेत. रायगड जिल्ह्यातील मिळखतखार मळा, तसेच सारळ-म्हाप्रोली गावातील ग्रामस्थांपुढे पिण्याचे पाणी मिळवण्याचे मोठे आव्हान आहे.
नदीला बारमाही पाणी नसते. त्यामुळे गावातील घरापासून कोसो दूर खडकाळ, चढउतार व काटेरी वाट तुडवीत विहिरीजवळ पोहचावे लागते. पाण्यासाठी येथील ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागते. या ठिकाणी असलेली विहीर मळा व म्हाप्रोली ग्रामस्थांची तहान भागवते, मात्र आता या विहिरीजवळ असलेल्या मोकळ्या जागेत काही ग्रामस्थांनी स्मशानभूमी बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. स्मशानभूमीशेजारी असलेल्या विहिरीतील पाणी पिता येणार नाही, आधीच पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष व संकट शिरावर असताना येथील विहीर निरुपयोगी झाली, तर पाण्यासाठी खूप हाल होतील. त्यामुळे महिला व ग्रामस्थांनी या स्मशानभूमीला कडाडून विरोध दर्शविला आहे. या ठिकाणी स्मशानभूमी झाल्यास दोन गावांना पाणीपुरवठा करणारी पानेरी विहीर पडिक होईल. उन्हाळ्यात या विहिरीचा मोठा आधार आहे. पाणीपुरवठा करणारी ही विहीर अत्यंत उपयुक्त असून तिच्या वापराने किमान 400 घरांची तहान भागत आहे. जोपर्यंत येथील गावाला जलजीवन मिशन योजनेंतर्गत नळपाणी पुरवठा नियमित सुरू होत नाही, तोपर्यंत प्रस्तावित स्मशानभूमीचे काम करू नये, असा निर्धार स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.