पनवेल : प्रतिनिधी
नवीन पनवेलमधील बिकानेर कोर्नर समोरील झाडे आपली होर्डिंगवरील जाहिरात दिसण्यासाठी तोडणार्या जाहिरातदारावर गुन्हा दाखल करून त्या ठेकेदारला काळ्या यादीत टाकण्याची मागणी अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटना आणि रिक्षा संघटनेने केली आहे.
नवीन पनवेलमधील रेल्वे स्टेशन समोरील बिकानेर कॉर्नरसमोर दोन वर्षापूर्वी पावसाळ्यात वृक्षारोपण करण्यात आले होते. त्या वेळी लावलेली झाडे जगावी यासाठी अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटना आणि रिक्षा संघटनेने काळजी घेतली होती. उन्हाळ्यात त्यांना पाणी घालून जगवण्यात आले. ही झाडे चांगली मोठी झाल्याने त्याची सावली पादचार्यांना आणि रिक्षा चालकांना मिळत होती. रविवारी पहाटे त्या ठिकाणी असलेल्या होर्डिंगवरील क्वालिटी सर्कल प्रायव्हेट ट्युशन क्लासची जाहिरात व्यवस्थित दिसण्यासाठी येथील तीन झाडे तोडण्यात आली. रात्री उशिरापर्यंत असलेली झाडे सकाळी तोडली असल्याचे रिक्षावाले आणि पेपर स्टॉलवाल्याला दिसले.
पृथ्वीचे वाढते तापमान आणि पर्यावरणाचा बिघडत असलेला समतोल राखण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा संदेश देत शासन करोडो रुपये खर्च करीत असताना आपली जाहिरात दिसावी यासाठी झाडांची कत्तल करणार्यांवर गुन्हा दाखल करून, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटना आणि रिक्षा संघटनेने केली आहे. याबाबत सिडकोकडे ही तक्रार केली असून त्यांच्या अधिकार्यांनी येऊन त्याची पाहणी केल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश विचारे यांनी दिली.
-जाहिरात दिसण्यासाठी झाडांची विनापरवानगी छाटणी केल्याची माहिती मिळाल्यावर त्याचा पंचनामा करायला सांगितला असून संबंधित होर्डिंगच्या ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.