Breaking News

मिशन भ्रष्टाचार निर्मूलन

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे नेते यांचे हेतूच मुळी कमालीचे भिन्न आहेत. भाजपचे आक्रमक नेते भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम एखाद्या मिशनप्रमाणे करतात. लोकांचा पैसा लुटमारीमध्ये कोणाच्या घशात जाण्यापासून रोखतात. करदात्यांच्या पैशाला नको तिथे वाटा फुटण्यापासून वाचवण्याचे हे मिशन आहे. सत्ताधारी नेतेही मिशनप्रमाणेच काम करतात, परंतु त्यांचे मिशन खुर्च्या शाबूत ठेवणे आणि जमेल तितका खोर्‍याने पैसा ओढणे हे असावे असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या हे एखादे व्रत घेतल्याप्रमाणे महाराष्ट्रातील भ्रष्टाचार खणून काढण्याच्या मागे आहेत. महाविकास आघाडीचे अर्धा डझन नेते आज संशयाच्या घेर्‍यात आहेत. त्याला बव्हंशी सोमय्या यांचे मिशन कारणीभूत आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी कोर्लाई गावातील भूखंडावर उभ्या असलेल्या कथित 18-19 बंगल्यांच्या मालमत्तेबाबत त्यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे सत्तारूढ शिवसेनेच्या नेत्यांचे पित्त खवळणे साहजिक होते. कारण या तथाकथित 18-19 बंगल्यांचा मालमत्ता कर खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांनीच भरल्याचे कागदपत्र सोमय्या यांनी जाहीररित्या फडकवले होेते. त्या जागेवर बंगलेच नाहीत असा खुलासा आता शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला असला तरी मालमत्तेबाबत ते अन्य काही बोलायला तयार नाहीत हे उघड आहे. उलटपक्षी सोमय्या यांच्यावरच त्यांनी भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले. ते अर्थातच बिनबुडाचे आहेत. राऊत यांनी दिलेले आव्हान स्वीकारून सोमय्या यांनी शुक्रवारी कोर्लई गावाकडे मोर्चा वळवला. रोहा, अलिबाग, पनवेल येथील शेकडो भाजप कार्यकर्ते त्यांच्या या दिंडीत सहभागी होते. उत्तर रायगड जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हेही सोमय्या यांच्यासोबत या वेळी उपस्थित होते. अशा नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची कमतरता नसल्यानेच भाजपची विजयपताका देशभर फडकते आहे. सोमय्या यांच्या कोर्लई दौर्‍याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिवसैनिकांतर्फे त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल अशी दर्पोक्ती आधी केली जात होती, परंतु प्रत्यक्षात घोषणाबाजी करणारे काही किरकोळ कार्यकर्ते वगळता सत्तारूढ पक्षांचे कार्यकर्ते निमूटपणे बसले होेते. भाजपच्या कार्यकर्त्यांची फौज कुणी पाहिली असती तर खरे चित्र त्यांच्या लक्षात आले असते. शिवसेना नेते संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात मोर्चा उघडला असला तरी त्यांना यश येणार नाही याची खात्री कोर्लई येथील सोमय्या यांच्या दौर्‍यावरून कोणालाही पटावी. सोमय्या यांनी केलेले आरोप हे मूलत: कोविड केंद्रातील भ्रष्टाचारासंदर्भात होते. त्यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर राऊत आणि त्यांच्या पक्ष सहकार्‍यांनी आजवर दिलेले नाही. राऊत यांच्या वतीने बोलण्यासाठी शिवसेनेचा एकही बिनीचा नेता पुढे आला नाही ही बाब बरेच काही सांगून जाते. ज्यावेळी सोमय्या अलिबागकडे निघाले होते त्यावेळी राऊत काय करत होते? सोमय्या यांच्या विरोधातील खोट्यानाट्या तक्रारींचे तथाकथित कागद घेऊन मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यासाठी त्यांना जावे लागले. त्यांच्या विरोधात सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे जे आरोप केले आहेत. त्याला उत्तर न देता स्वत:च्याच नेत्याचे तुलनेने जुने प्रकरण उकरून काढले, ते कशासाठी असा सवाल आता केला जात आहे. विरोधीपक्ष आणि सत्तारूढ पक्ष यांची ही दोन भिन्न मिशन मतदारांना काय संदेश देतात हे यथावकाश कळेलच.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply