Breaking News

बोंडेशेत आदिवासीवाडीत पाणीटंचाईची स्थिती नाजूक

महिलांची रात्री विहिरीजवळ धावपळ; रात्र काढावी लागतेय जागून

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायत हद्दीमधील बोंडेशेत या आदिवासीवाडीत मागील 15 दिवसापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिला विहिरीवर थांबून थेंबथेंब साठून राहणारे पाणी घरापर्यंत आणण्यासाठी रात्र जागून काढत आहेत.

कर्जत तालुक्याच्या आदिवासी आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाचे ट्रँकर फिरू लागले आहेत. मात्र बोंडेशेत या आदिवासी वाडीत अद्यापही ट्रँकर पोहचला नाही. 50 घरांची वस्ती असलेल्या या आदिवासी वाडीमध्ये असलेली पाण्याची एकमेव विहीर आटून गेली आहे. त्यामुळे या वाडीमधील महिला, दिवसा आसपासच्या भागात पाणी आणण्यासाठी जातात. पेंढरीपासून खाली असलेल्या पोश्री नदीवर जाऊन बोंडेशेत गावातील महिला या पाण्याचे नियोजन करीत आहेत. त्या ठिकाणी कपडे धुण्याची कामे करणार्‍या या महिलांना मात्र पिण्याचे पाणी शोधण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. दिवसा कपडे, भांडी, आंघोळीचे पाणी आणण्यासाठी या आदिवासी वाडीमधील महिला वणवण भटकत असतात. तर पिण्याच्या पाण्याचे दोन हांडे मिळविण्यासाठी या महिला गेल्या महिन्यापासून कोरड्या पडलेल्या विहिरीवर रात्री थांबून राहतात.

34-35फूट खोल असलेल्या या विहिरीने तळ गाठला असून  विहिरीतील काळ्या दगडातून थेंब थेंब पाणी बाहेर पडत असते, ते पाणी या वाडीमधील महिला गोळा करून घरी आणतात. त्यासाठी  50 घरांच्या वाडीमधील महिलांनी दोन भाग पाडून घेतले आहेत. 25 कुटुंबातील महिला आज तर राहिलेल्या 25 कुटुंबातील महिला  दुसर्‍या दिवशी विहिरीवर दोन हांडे पिण्याचे पाणी मिळावे म्हणून थांबून राहतात. दिवसा त्या विहिरीवर सर्व महिला आपले हांडे आणि अन्य भांडी ठेवून देतात आणि रात्री जेवण करून महिला गटागटाने विहिरीवर पोहचतात. तेथे शेकोटीचा उजेड करून महिला पाणी भरत असतात. साधारण मध्यरात्री दीड दोन वाजेपर्यंत या वाडीमधील महिला विहिरीवर थांबून असतात.

Check Also

खासदार बारणेंच्या विजयासाठी पनवेलमध्ये जोरदार प्रचार

आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्त मावळ …

Leave a Reply