कर्जत : बातमीदार
मुंबईतील फिल्मसिटीमध्ये इव्हेंट मॅनेजर असलेल्या शोमित संतबहादूर सिंग या तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत नेरळ पोलिसांना सापडला असून, या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोमित संतबहादूर सिंग (वय 28, रा. जोगेश्वरी, मुळ उत्तरप्रदेश) हा 13 एप्रिल रोजी घराबाहेर पडला होता, तो रात्री घरी परत आला नाही, म्हणून तो हरवला असल्याची तक्रार आंबोली पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी शोमितचे मोबाईल लोकेशन शोधले असता, ते कर्जत तालुक्यातील भूतीवली येथील मोबाईल टॉवर दाखवत होते. त्यामुळे 15 एप्रिल रोजी आंबोली पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनी नेरळ पोलिसांसह भुतीवली गाव गाठले. मात्र त्या परिसरात कुठेही शोमितचा थांगपत्ता लागला नाही. खबर्याने 30 एप्रिल रोजी दिलेल्या माहितीनुसार पोलीस नाईक समीर भोईर आणि प्रशांत मोरे यांनी माणगाववाडी परिसरात शोध घेतला असता, त्यांना एका तरुणाचा मृतदेह दरीमध्ये दिसला. मात्र तो कुजलेल्या अवस्थेत असल्याने आणि अंधार पडू लागल्याने पोलीस पुन्हा माघारी आले. बुधवारी (1 मे) रोजी सकाळी आणि नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक रतीलाल तडवी, पोलीस कर्मचारी समीर भोईर, रतन बागुल, अमोल पाटील हे नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्याम पावरा आणि शोमित सिंग यांच्या नातेवाईकांसह माणगावच्या जंगलात पोहचले. तेथे त्या मृतदेहाचे शव विच्छेदन करण्यात आले. मृतदेह बाहेर नेण्याच्या अवस्थेत नसल्याने त्याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.