Breaking News

‘…म्हणूनच स्वातंत्र्यसैनिक मान्यतेला मुकलो’

क्रांतीवीर नानासाहेब पुरोहित यांच्यासोबत अनेक वर्षे समाजवादी पार्टीमध्ये सक्रीय कार्यकर्ता राहिलो.स्वातंत्र्यप्राप्तीसह मुरूड-जंजिरा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचा तालुका अध्यक्ष म्हणून देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली. मात्र, उमरठ येथील कार्यक्रमप्रसंगी तत्कालीन मंत्री वसंतराव नाईक यांच्या आग्रहाखातर समाजवादी पक्षातून काँग्रेस पक्षामध्ये गेलो आणि दादासाहेब तथा शं. बा. सावंत यांना आमदारपदी निवडून आणले म्हणून स्वातंत्र्यसैनिक या मान्यतेला मुकलो, अशी खंत संयुक्त महाराष्ट्र समितीचे तत्कालीन पोलादपूर तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती सिताराम दौलती सकपाळ यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी उद्वेगाने नानासाहेब पुरोहित यांच्याप्रती श्रद्धा असूनही त्यांच्याकडून आपणावर हा अन्याय झाल्याची व्यथा मांडताना सरकारने आपणास स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा द्यावा, अशी मागणीही केली.

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला प्रारंभ झाला. अनेकांना प्रिवेंटीव डिटेन्शनखाली अटक झाली. डॉ. आंबेडकरांची शेवटची भेट संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालविण्यासाठी, आपापली ध्येये बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकवट व्हावे, या कल्पनेने डॉ. आंबेडकर अगदी झ्पाटलेले होते. दिल्लीहून ते मुंबईला आले नि बॅ. समर्थ यांच्याकडे चर्चगेटवरील लव्ह कोर्ट बंगल्यात उतरले. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना प्रबोधनकार ठाकरे, सुरबानाना टिपणीस, बापूसाहेब देशपांडे यांनी नागोठण्याला बापूसाहेब देशपांडेंच्या घरी केली होती. संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले अध्यक्ष सुरबानाना टिपणीस होते.

संयुक्त महाराष्ट्र समितीचे तत्कालीन पोलादपूर तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती सिताराम दौलती सकपाळ त्यांच्या योगदानाची माहिती दिली यावेळी ते म्हणाले की, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी अनंत बागाईतकर आदी मंडळींच्या प्रभावाने श्रध्दास्थान क्रांतीवीर नानासाहेब पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलादपूरच्या कुंभारवाडयात सध्याच्या भैरवनाथनगरमध्ये चळवळीचे कार्यालय सुरू केले. 282 गांवे पायी चालून संयुक्त महाराष्ट्राची भूमिका जनमानसांत रूजविली. काकासाहेब गाडगीळ यांची सध्याच्या पोलादपूर एस.टी.स्थानकासमोरील मोकळया जागेत सभा झाली. त्यावेळी काकासाहेबांनी,’संयुक्त महाराष्ट्राची पिल्लावळ सध्या वळवळ करीत आहे.’ अशी टीका केली. यामुळे अध्यक्ष सिताराम दौलती सकपाळ यांनी पायाने अधू असलेल्या धाकी दरेकर, किशी पार्टे आणि शांती भुवड या महिलांच्या मदतीने काकासाहेबांना बांगडया भरल्या. यावेळी पोलीसांनी तिघींना ताब्यात घेतले. पण यामागे सूत्रधार आपणच असल्याचे सांगून सि. दौ. सकपाळ यांनी त्यांना सोडण्याची विनंती केली. यानंतर 36 कार्यकर्त्यांच्या तुकडीतील अनेकांची धरपकड करून पोलीसांनी अटकसत्र केले. यामध्ये अध्यक्ष सि. दौ. सकपाळ यांच्यासोबत लाडोबा हैबती उतेकर, शंकर मुजुमलेवाणी, शंकरशेठ मेठा, कृष्णा रामा डांगे, गोविंद सुकाळे, जयराम कुंभार, यशवंत दरेकर यांना अटक करून महाडच्या कोर्टासमोर नेण्यात आले. तेथून सात दिवसांची पोलीस कस्टडी मिळाल्याने ठाणे येथील सेंट्रल जेलमध्ये नेण्यात आले. ठाणे येथे नेताना गुढीपाडव्याचा दिवस होता. वाटेत पेण येथे या राजकीय कैद्यांची गाडी बंद झाल्याने तेथील हॉटेलमालकांनी या सर्वांना गोडधोड खायला दिले. तेथून ठाणे येथे रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जेलमध्ये गेल्यावर सर्वांना गुन्हेगारांच्या बराकीमध्ये डांबण्यात आले. यासुमारास आचार्य प्र. के. अत्रे, काँम्रेड डांगे आणि अनंत बागाईतकर आदी नेते राजकैदी म्हणून वेगळया बराकीमध्ये होते. सि.दौ.सकपाळ यांनी जेलरला आम्ही गुन्हेगार नसून राजकैदी असल्याचे सांगून वेगळी व्यवस्था करण्यास भाग पाडले. जेलमध्ये ’रघुपती राघव राजाराम पतित पावन सिताराम’ ही प्रार्थनाही गुन्हेगार कैद्यांसोबत म्हणण्याऐवजी स्वतंत्रपणे म्हणण्याचा आग्रहही सि.दौ.सकपाळ यांनी धरल्याने जेलरला त्यास मान्यता द्यावी लागली. जेवणात भाकर्‍या आणि भाताची पेज दिली जात असे. पण कच्च्या भाकर्‍या असल्याने त्या खाता येत नव्हत्या म्हणून सि. दौ. सकपाळ यांनी जेलरला अन्नबहिष्काराची धमकी दिली. यामुळे त्यांना हव्या तशा भाकर्‍या भाजून घेण्याची परवानगी मिळाली. माणगाव येथील पवार आडनावाचा कैदी भाकर्‍या भाजायचे काम करायचा; त्याने हव्या तशा आणि हव्या तेवढया भाकर्‍या भाजून दिल्यामुळे सात दिवस चांगले भरपेट अन्न मिळू लागले. शंकरशेठ मेठा हे तर तब्बल 21 भाकर्‍या खात असत. ठाणे येथे जेलमध्ये जाताना सि. दौ. सकपाळ यांनी चामडयाच्या चप्पलांच्या टाचांमध्ये दहा रूपयांच्या नोटा लपवून नेल्या होत्या. त्यामुळे तेथून परतीच्या प्रवासावेळी त्या उपयोगी पडल्या. परत निघाल्यावर पेण येथील हॉटेलमालकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी गोडधोड जेवण दिल्याबद्दल त्यापेकी दहाच्या नोटा देऊन सि. दौ. सकपाळ यांनी कृतज्ञता व्यक्त केली. महाड कोर्टात तब्बल वर्षभर खटला चालला आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील या आंदोलकांतर्फे निष्णात वकील शं.बा.तथा दादासाहेब सावंत आणि भाई वाडकर यांनी तो लढला. या वेळी काकासाहेब गाडगीळ मंत्री होते. दादासाहेब सावंत यांनी एका वृत्तपत्राचे कात्रण दाखविले; त्यामध्ये काकासाहेब गाडगीळ यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे समर्थन केल्याची जुनी बातमी होती. या वेळी कोर्टासमोर काकासाहेबांनी चळवळीच्या विरोधात पोलादपूर येथे वक्तव्य करताना स्वत:च्याच भूमिकेत अचानक बदल केल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाल्याने काकासाहेबांना बांगड्यांचा आहेर झाल्याचा युक्तीवाद केला आणि सर्वांचीच कोर्टाने निर्दोष मुक्तता केली. एका मंत्र्याविरोधातील खटला जिंकल्याने संयुक्त महाराष्ट्र समर्थकांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी आमची महाड येथील रस्ते गुलालाने माखेपर्यंत मोठया जल्लोषात मिरवणूक काढली. पोलादपूर येथे आलो तेव्हाही मामासाहेब साबळे आणि काका करमरकर आदींनी शेकडो सुहासिनींच्या हातून ओवाळून आम्हा सर्वांचे औक्षण केले. सि. दौ. सकपाळ या आठवणी सांगताना अत्यंत भावूक झाले होते.

नेहमीप्रमाणे क्रांतीवीर नानासाहेब पुरोहित यांचे आशीर्वाद घेऊन आंदोलनात झोकून द्यायचे असा शिरस्ता असूनही पुढे सि. दौ. सकपाळ हे उमरठ येथील कार्यक्रमावेळी तत्कालीन मंत्री वसंतराव नाईक यांच्या गाडीमधून गेले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार समाजवादी पार्टी सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला म्हणून नानासाहेबांनी सि. दौ. सकपाळ यांनी स्वातंत्र्यलढ्यावेळी गुप्तवार्ता पोहोचविण्याचे काम केलेले असूनही सि.दौ.सकपाळ यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून मान्यता डावलली, ही आठवण सांगताना सि. दौ. सकपाळ यांनी, नानासाहेब कितीही आदरणीय श्रध्दास्थान होते तरी त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील 108 जणांचे हौतात्म्य घेणार्‍या मोरारजीभाईच्या येथील नातलगांनाच स्वातंत्र्यसैनिकाचा दर्जा व मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करून आमचे स्वातंत्र्यलढयातील योगदान काळाच्या पडद्याआड लपविण्याचा प्रयत्न केला हा अन्याय झाला, असे उद्वेगाने सांगितले. सध्या कापडे बुद्रुक येथील फौजदारवाडीतील छोटयाशा घरामध्ये पत्नी, मुले, सुना, नातवंडे यांच्यासोबत वृद्धापकाळी जीवन सुखाने व्यतीत करणारे सि. दौ. सकपाळ यांनी स्वातंत्र्यसैनिक म्हणून पेन्शन मिळण्यासाठी नव्हे तर देशासाठी जे केले तो इतिहास पुढच्या पिढीसमोर येण्यासाठी तरी सरकारने आपल्या योगदानाची दखल घेण्याची आवश्यकता आहे, असे सांगून ’जय महाराष्ट्र’ म्हणत निरोप दिला.

-शैलेश पालकर, खबरबात

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply