नाशिक ः प्रतिनिधी
राष्ट्रपती पदकविजेते नाशिक महापालिका अग्निशमन दलाचे उपकेंद्रीय अधिकारी दीपक भटू गायकवाड (48) यांचा अमरावती येथे अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते सुटी संपवून नागपूर येथे अग्निशमन विभागीय प्रशिक्षणाकरिता शिवशाही बसने हजर होत होते. बसला अमरावती येथे अपघात झाल्याने त्यात गायकवाड गंभीर जखमी झाले होते.
नाशिक अग्निशमन मुख्यालय येथे उपकेंद्रीय अधिकारी म्हणून गायकवाड सेवेत होते. अग्निशमन दलाचे धाडसी जवान म्हणून त्यांची ओळख होती. 2016 साली जिल्ह्यात आलेल्या महापुरात कुंदेवाडी येथे पुरात अडकलेल्या तिघांना तसेच पालखेड येथे सहा व्यक्तींना पुराच्या पाण्यातून त्यांनी सुरक्षित बाहेर काढले होते, तसेच जुन्या नाशकात मागील वर्षी कोसळलेल्या वाड्याच्या ढिगार्याखाली दबलेल्या तिघा युवकांना त्यांनी अथक परिश्रम घेऊन बाहेर काढले होते. आडगाव, वडाळागाव परिसरात लागलेल्या भीषण आगीच्या वेळीही गायकवाड यांनी अग्रभागी राहून शर्थीचे प्रयत्न करीत आपत्कालीन मदतकार्य केले होते.
त्यांची निवड राष्ट्रीय अग्निशमन विभागीय प्रशिक्षणासाठी झाली होती. जून महिन्यात प्रशिक्षण पूर्ण होणार होते. दरम्यान, सुटीवर ते मागील आठवड्यात घरी आले होते. सुटी संपवून ते नागपूर येथे प्रशिक्षणसाठी शिवशाही बसने जात होते. या बसला झालेल्या अपघातात त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर मार लागला होता. त्यांना उपचारासाठी अमरावती येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.