कर्जत : प्रतिनिधी
प्रेम म्हणजे खरं काय? युवक – युवती प्रेमा मध्ये अडकले की वेडे होतात. त्यांना भान रहात नाही. त्यांना जन्म दिलेल्या आई-वडिलांचीही फिकीर रहात नाही. कधी कधी प्रेमविवाह घटस्फोटाकडे जाताना दिसतात. मात्र मजनू हा चित्रपट प्रेमाची खरी परिभाषा सांगणारा आहे, असा विश्वास या चित्रपटातील नायिका श्वेतलाना अहिरे हिने कर्जत येथे व्यक्त केला.
मजनू हा चित्रपट शुक्रवारी (दि. 10) सुमारे पाचशे चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने या चित्रपटाच्या टीमने कर्जतकरांची भेट घेण्याचे ठरविले. त्यासाठी कर्जतच्या रॉयल गार्डन सभागृहात एका विशेष समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लेखक गोवर्धन दोलतोडे, सहनिर्माता इरफान भोपळी, चित्रपटाचा नायक रोहन पाटील, नायिका श्वेतलाना अहिरे आदी या वेळी उपस्थित होते.
संदीप ओसवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सय्यद अकबर यांनी प्रास्ताविकात भेटीचा उद्देश सांगितला. गोवर्धन दोलतोडे यांनी चित्रपटाबद्दल माहिती दिली. सहनिर्माता इरफान भोपळी यांनी, हा चित्रपट सर्वांना आवडेल व गर्दीचे उच्चांक गाठेल, असा विश्वास व्यक्त केला. नायक रोहन पाटील याने चित्रीकरणा दरम्यान झालेले किस्से सांगितले. या वेळी नायक व नायिकेने चित्रपटातील काही हिट संवाद सादर करून उपस्थितांची मने जिंकली.