मुरूड : प्रतिनिधी
मुरूड येथील माजी नगरसेविका नादीया ढाकम यांना तिच्या पतीने भ्रमणध्वनीद्वारे ट्रिपल तलाक दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती ताबिश इब्राहिम ढाकम याच्या विरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरूडमध्ये प्रथमच ट्रिपल तलाकची केस समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
ताबिश ढाकम याचा पहिला विवाह झाला असताना त्याने ते अंधारात ठेवून नादिया यांच्याशी विवाह केला होता, तसेच तो नादियाला शारीरिक व मानसिक त्रास देत होता, असा आरोप आहे. पीडित महिला न्यायासाठी वणवण भटकत होती. अखेर भाजप अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अमीर खांजादा यांनी तिला सहकार्य केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नादिया ताबीश ढाकम (वय 38) हिचे लग्न 2003मध्ये अशफाक जैनू अबिदीन इद्रुस यांच्याशी झाले होते. 11 वर्षांनी पतीचे निधन झाल्यानंतर नादिया यांनी ताबीश इब्राहिम ढाकम याच्याशी 7 जानेवारी 2019 रोजी नेरळ येथील मशिदीत मुस्लीम धर्मानुसार दुसरे लग्न केले, परंतु नादियाच्या म्हणण्यानुसार, ताबीशने त्याचे पहिले लग्न झाल्याचे लपविले होते. तरीही ही बाब माफ करून आम्ही संसार करीत होतो. लग्नापूर्वी ताबीशने मला व माझ्या घरातील सदस्यांना मुरूड येथे नवीन सदनिका घेऊन देणार असल्याचे, तसेच तो आठवड्यातील तीन दिवस माझ्याकडे आणि तीन दिवस पहिल्या पत्नीकडे राहणार असल्याचे सांगितले होते. लग्नानंतर ताबीशने नवीन सदनिका खरेदी केली नाही. मी पहिल्या पतीच्या घरी राहत होते. ताबीशला सदनिकेबाबत विचारणा केली असता, तो टाळाटाळ करीत असे.
कालांतराने ताबीशपासून नादिया गरोदर राहिली. ते कळल्यावर ताबीशने मला आता मूल नको, असे सांगून निघून गेला. दुसर्या दिवशी घरी येऊन त्याने जबरदस्तीने गर्भपाताची गोळी खाण्यास दिल्याने माझी तब्येत बिघडली. 15 दिवसांनी अधिक रक्तस्राव होऊ लागल्याने ताबीशला फोन करून मला डॉक्टरकडे नेण्याबाबत सांगितले, मात्र त्याने डॉक्टरकडे न नेता पुन्हा कोणती तरी मेडिसीन जबरदस्तीने खाण्यास दिली. त्यामुळे मला अधिकच त्रास होऊ लागला. म्हणून मी स्वतः रुग्णालयात तपासणी करवून घेतली असता, माझा गर्भपात झाल्याचे समजले. याबाबत विचारणा केली असता, ताबीश शिवीगाळी व दमदाटी करू लागला व नंतर तर टाळाटाळ करू लागला. फोन केल्यावर तलाक व धमक्या देत असे. शेवटी मी 1 जुलै 2019 रोजी ताबीशच्या घरी राहण्यास गेले. त्या वेळी त्याने शिवीगाळ व मारहाण करून धक्के मारून घराबाहेर काढले. त्याच्यापासून माझ्या जीवितास धोका आहे, असे नादिया यांचे म्हणणे आहे.
याबाबतची तक्रार मुरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यावर ताबीश ढाकम याच्या विरोधात भा.दं.वि. कलम 498 अ, 312, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेला न्याय मिळून देण्यासाठी भाजप नेते अमीर खांजादा यांच्यासह इम्रान सुभेदार, तन्झीम कासकर, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जाहिद फकजी यांनी पत्रकार परिषद घेऊन ताबीश ढाकम याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.