Breaking News

रायगडातील वनसंपदा, जैवविविधतेची होरपळ

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला, डोंगरदर्‍यांनी वेढलेला आणि ऐतिहासिक वारशांचा ठेवा लाभलेल्या रायगड जिल्ह्यात मानवनिर्मित वणव्यांची दाहकता वाढत आहे. मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील सुधागड, माणगाव, रोहा, कर्जत आदी तालुक्यातील बहुतांश भागांत लागलेल्या मानवनिर्मित वणव्यांमुळे वनसंपदा, जैवविविधता व ऐतिहासिक वस्तूंची होरपळ झाली आहे. मानवी संपत्तीचेदेखील नुकसान झाले आहे. शिवाय तापमान वाढदेखील होत आहे.

सुधागड पालीतील सरसगड किल्ल्यावर नुकताच  प्रचंड मोठा मानवनिर्मित वणवा लागला होता. हा वणवा 24 तासांहून अधिक काळ सुरू होता. स्थानिक ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी वणवा विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे वणवा किमान मानवी वस्तीत आला नाही. मात्र किल्ल्याचा बहुतांश भाग होरपळला. किल्ल्यावर नव्याने लावलेले रोपे व संवर्धन केलेली झाडे जळून खाक झाली. येथील माकडे, वानरे व पक्ष्यांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांचा अधिवासदेखील नष्ट झाला. गुरुवारी (दि. 10) सुधागड तालुक्यातील ताडगाव दुधणी येथील डोंगरावर मोठा वणवा लागला होता. त्यामध्ये भाताचे माच, पेंढा, गवत, लाकूडफाटा व कुंपण जळून खाक झाले आहे.

काही दिवसांपूर्वी रोहा तालुक्यातील वरसे, कोलाड, पुई, आंबेवाडी आदी भागांत वणवे लागून वनसंपदेचे मोठे नुकसान झाले. माणगाव तालुक्यातील विळे भागाड एमआयडीसी भागातील डोंगरावर व माळरानावर डिसेंबर महिन्यात वणवा लागला होता. स्थानिक पर्यावरण व निसर्ग अभ्यासक राम मुंढे यांनी या भागाची पाहणी केली असता या वनव्यामध्ये ठिपकेवाली मुनिया आणि इतर पक्ष्यांची घरटी पूर्णपणे जळून गेली होती. शिवाय पूर्ण विकसित झालेली अंडीदेखील जळाली. पक्ष्यांचा अधिवास व खाद्यदेखील नष्ट झाले होते. अशाच प्रकारचे वणवे जिल्ह्यात विविध ठिकठिकाणी लागणे सुरू झाले आहे.

  जैवविविधता धोक्यात

नैसर्गिक व कृत्रिम वणव्यांमुळे जैवविविधता व सजीव सृष्टी धोक्यात येत आहे. पर्यावरणाची प्रचंड हानी होते. प्रदुषण वाढते. सरटणारे जीव (घोरपड, साप, सरडे, विंचू इत्यादी), किटक तसेच झाडे-झुडपे, औषधी वनस्पती आगीमध्ये भस्मसात होतात. फुलपाखरांना त्यांचे अन्न मिळविता येत नाही. विविध प्राण्यांचे व पक्ष्यांचे आसरे-निवारे संपुष्टात येतात. त्यांची पिल्लेदेखिल या आगीत होरपळून मरतात. दुर्गम भागात राहणार्‍या आदिवासींना देखिल वणव्यांमुळे धोका संभवतो.

  ऐतिहासिक वास्तू व किल्ल्यांना हानी

वणव्यांमुळे छोट्या-मोठ्या गड-किल्ल्यांचे व ऐतिहासिक ठेव्यांचे बांधकाम कमकुवत होऊन ते ढासळण्याची भीती असते. किल्ल्याच्या तटबंदीवर, बुरुजांवर उगवलेले गवत जळाल्यामुळे त्यांचे नुकसान होते. वणव्यात वनसंपदा नष्ट होत असल्यामुळे येथे राहणार्‍या पशूपक्षांची अन्नपाण्यासाठी खुप वाताहत होत आहे. तेथील मोर, माकड व भेकर हे प्राणी अन्नपाण्यासाठी दहिदिशा भटकतात.

  ठोस उपाययोजना हव्यात

कृत्रिम वणव्यांमुळे संपुर्ण सजीव सृष्टी धोक्यात येते. पर्यावरणाचा र्‍हास होतोे. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून विविध उपाय व जनजागृती केली जाते. शिक्षक राम मुंढे यांनी शाळकरी मुलांच्या माध्यमातून वणवे रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. विविध शाळेतील विद्यार्थी पथनाट्य सादर करतात. मात्र हे प्रयत्न अपुरे आहेत. या उपायांबरोबरच स्थानिक लोकांना व आदिवासींना वणव्याचे दुष्परिणाम सांगून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने वनविभाग, निसर्गप्रेमी व आदिवासी विद्यार्थ्यांच्या मदतीने जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच दृकश्राव्य माध्यमांद्वारे वनव्यांमुळे होणारी हानी सर्वांसमोर आणली गेली पाहिजे. लोकांनीदेखील स्वयंस्फूर्तीने वणवे रोखणे व स्वतः लावणार नाही यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.

बहुतांश वणवे मानवनिर्मित आहेत. वणवे रोखण्यासाठी व आपत्ती निवारणासाठी गावपातळीवर 10 तरुणांची टीम तयार करून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मानवनिर्मित वणवे रोखण्यासाठी गावागावातील लोकांचे प्रबोधन व जनजागृती केली जात आहे. ग्रामपंचायतींनादेखील आवाहन केले आहे.

-दिलीप रायण्णावार,  तहसीलदार, पाली सुधागड

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply