जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर
अलिबाग : प्रतिनिधी
तालुक्यातील मिळखतखार-मळा या रस्त्याचा विषय गेली काही दिवस माध्यम-समाजमाध्यमातून चर्चेला आला आहे. मात्र काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन सादर करून विरोधी भूमिका मांडली आहे.
मिळखतखार-मळा या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने तेथील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणी साठी काही दिवसांपूर्वी ’रस्ता नाही तर मत नाही’ असे फलक लावून राजकीय पुढारी, प्रशासकीय अधिकारी यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या या प्रयत्नांना काही अंशी यशदेखील आल्याचे समजते. परंतु आता हा रस्ता होऊ नये, त्यामुळे सुपीक शेतजमीन नापीक होईल अशी भीती व्यक्त करून काही ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीला विरोध दर्शविला आहे.
रुपेश वसंत कडवे, साईनाथ रामचंद्र कडवे, अर्जुन गणपत ठोंबरे, सुरेश अनंत ठोंबरे, चंद्रकांत भास्कर ठोंबरे यांच्यासह अन्य 20 जणांच्या स्वाक्षर्या असलेले रस्त्याला विरोध दर्शविणारे निवेदन नुकतेच जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात मिळखतखार ग्रामस्थांनी म्हटले आहे की, मिळखतखार- मळा रस्त्यालगत त्यांच्या शेतजमिनी आहेत. या जमिनीत ते भातशेती, वाल, पापडी यासारखी पीके घेत आहेत. रस्त्यामुळे ही पिकती शेती नापीक होईल.
शेतकर्यांच्या मालकीची प्रत्येकी 4 ते 5 गुंठे जमीन या रस्त्यासाठी बाधित व नापीक होणार असल्याने, त्यांचा रस्त्यासाठी विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत रस्त्याला परवानगी देऊ नये अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
मळा हे गाव डोंगर दर्यातून येणार्या नदीच्या पात्राशेजारी वसले आहे. पावसाळ्यात या गावाला पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागते. नदीच्या दोन्ही बाजूला कच्च्या स्वरूपाचे बांध आहेत. हे दोन बांध भराव घालून मोठे केले व रस्त्याला जोडले तर गावातील लोकांची रस्त्याची समस्या सुटेल, असा पर्यायदेखील या निवेदनातून मांडण्यात आला आहे. एकूणच मिळखतखार-मळा हे गाव रस्त्याच्या समस्येमूळे चर्चेत आले आहे, पण हीच समस्या वादाचा विषयदेखील बनली आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.