Breaking News

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून बाल्मर लॉरी सीएफएस येथील पर्ल फ्रेट सर्व्हिसेसच्या कामगारांना भरघोस पगारवाढ

बाल्मर लॉरी सीएफएस येथील पर्ल फ्रेट सर्व्हिसेसच्या कामगारांना भरघोस पगारवाढ

उरण ः रामप्रहर वृत्त

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील भेंडखळ येथील बाल्मर लॉरी सीएफएस येथील पर्ल फ्रेट सर्व्हिसेस मधील कामगारांना दरमहा 4500 रुपयांची भरघोस पगारवाढ तसेच सुविधा देण्याचा करार झाला आहे.

पर्ल फेट सर्व्हिसेसच्या माध्यमातून बाल्मर लॉरी भेंडखळ येथे काम करणार्‍या कामगारांनी काही महिन्यांपूर्वी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले होते, त्या वेळेला कामगारांचा वेतनवाढीचा करार प्रलंबित होता. जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या अगोदर या कामगारांचे नेतृत्व महाराष्ट्र जनरल कामगार युनियन करीत होती, मात्र या संघटनेची ध्येय धोरणे न पटल्यामुळे कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांची भेट घेऊन आपले गार्‍हाणे मांडले. या कामगारांचे गार्‍हाणे ऐकून जितेंद्र घरत यांनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र बाल्मर लॉरीच्या व्यवस्थापनाने हे कामगार पर्ल फ्रेट सर्व्हिसेसचे आहेत. त्यांच्या संदर्भात आम्ही काही देणे लागत नाही किंवा पगारवाढीचे करार आम्ही करू शकत नाही, अशी भूमिका घेतल्यावर घरत यांनी उरणचे आमदार महेश बालदी यांची कामगारांसह भेटून आपली व्यथा मांडली.

आमदार महेश बालदी यांनी व्यवस्थापनाशी चर्चा करून कामगारांना न्याय देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर मुख्य व्यवस्थापनाची वेळकाढूपणाची भूमिका पाहून व्यवस्थापनाला आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला. यानंतर मात्र व्यवस्थापनाने सकारात्मक चर्चा करून पर्ल फ्रेट सर्व्हिसेसच्या कामगारांचा दोन वर्षासाठी करार झाला. त्यानुसार कामगारांना दरमहा चार हजार 500 रुपयांची पगारवाढ देण्याचे मान्य केले, त्याचबरोबर दोन लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, बोनस, भरपगारी रजा व इतर सुविधांचा करार पर्ल फ्रेट सर्व्हिसेसच्या कार्यालयात झाला.

या वेळी पर्ल फ्रेट सर्व्हिसेसचे एम. डी. जमशेद आश्रफ यांनी करारावर स्वाक्षरी केली, तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र घरत, संघटक चंद्रकांत कडू, बाल्मर युनिटचे संघटना अध्यक्ष राजेंद्र ठाकूर, उपाध्यक्ष किशोर ठाकूर, नरेश ठाकूर, कमलाकर कडू, निलेश घरत, हसमुख नाईक उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply