खारघर : प्रतिनिधी
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनसाठी रेडिऑलीजिस्ट पद भरण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. रेडिऑलीजिस्टच नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणार्या महिलांना सोनोग्राफीसाठी खाजगी रुग्णालयात जावे लागत आहे.
120 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात 20 खाटांचे ट्रॉमा सेंटर, 100 खाटांचे रुग्णालय आहे. या व्यतिरिक्त शवागार, शवविच्छेदनगृह या रुग्णालयात असणार आहे. कोविडच्या तीन लाटांमध्ये या रुग्णालयाला कोविडचा दर्जा दिला गेला होता. कोविड नियंत्रणात आल्यावर पुन्हा एकदा विविध व्याधी जडलेले रुग्ण याठिकाणी उपचार घेत आहेत. डॉक्टर नसल्याने मशीन कार्यान्वित होत नाही. यामुळे विशेषत: गरोदर महिलांची मोठी गैरसोय होत आहे.
उपजिल्हा रुग्णालयात जाणार्या रुग्णांमध्ये आदिवासी,कातकरी समाजाचे बांधव, ग्रामीण भागातील ग्रामस्थ, आर्थिक परिस्थिती बेताची असलेले नागरिक उपचार घेत असतात त्यामुळे शासनाच्या आरोग्य विभागाने याबाबत त्वरित उपाययोजना राबवून ही मशीन कार्यान्वित करण्याची गरज आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन कार्यान्वित आहे.ती चालविण्याकरिता रेडिओलॉजिस्ट नसल्याने सध्याच्या घडीला ती बंद अवस्थेत आहे.
-डॉ. सचिन संकपाळ, प्रभारी अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय पनवेल