प्रलंबित प्रमुख मागण्यांवर चर्चा
अलिबाग ः प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या आणि भेडसावणारया समस्यांबाबत राज्यपालांना माहिती देऊन त्यावर चर्चा करण्यात आली.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी केले. 1 नोव्हेंबर 2005नंतर सेवेत लागलेल्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करून ज्या डीसीपीएसधारक शिक्षक बांधवांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या कायदेशीर वारसास अनुकंपा तत्त्वाचा लाभ मिळावा, ज्या डीसीपीएसधारक शिक्षकांचा मृत्यू झाला आहे अशांना सेवेची कोणतीही अट न ठेवता सरसकट 10 लाख रुपये अनुदान प्राप्त झाले पाहिजे. एमएससीआयटीला 2022पर्यंत मुदतवाढ द्यावी व ज्यांची वसुली करण्यात आलेली आहे त्यांची रक्कम त्यांना अदा करावी, अशी मागणी या वेळी निवेदनातून करण्यात आली.
शिक्षक मतदारसंघात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी महाराष्ट्र लोकप्रतिधित्व कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत चर्चा करण्यात आली. प्राथमिक शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे, शाळांना विद्युत देयके अनुदान प्राप्त होणे, शिक्षकांना कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती सुविधा प्राप्त होणे, आंतरजिल्हा बदलीसाठी पती-पत्नी विनाअट एकत्रिकरण करणे या परिषदेच्या प्रमुख मागण्या आहेत.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संचलित त्रैमासिक शिक्षकमित्रच्या अंकाचे प्रकाशन या वेळी राज्यपालांच्या हस्ते झाले. शिक्षक परिषदेने कोविड काळात केलेल्या कामाची माहितीही राज्यपालांना देण्यात आली.
जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करून आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्यासाठी पालकांना प्रोत्साहित करावे, यासाठी शिक्षकांनी प्राधान्य द्यावे. शिक्षक हा राष्ट्राचा निर्माता असून समाजाचा मित्र आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी या वेळी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळात राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, त्रैमासिकाचे संपादक डॉ. सतपाल सोवळे, शिक्षक नेते रावसाहेब रोहकले, राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे, कार्यकारी अध्यक्ष मधुकर उन्हाळे, प्रकाश चतरकर, कार्याध्यक्ष बाबुराव गाडेकर, भरत मडके, संपर्कप्रमुख राजेंद्र नांद्रे, बालाजी गुबनारे, नितीन चव्हाण यांचा समावेश होता.