उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुक
पुणे : प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासकामांच्या माध्यमातून जनतेची मने जिंकली आहेत, अशा शब्दांत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंतप्रधान मोदींच्या विकासवादी धोरणाचे पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी जाहीर कौतुक केले. पंतप्रधान मोदी जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून लोकांची मने जिंकली. जे लोकं विकासाबद्दल बोलतात त्यांनाच जनता संधी देते, असे ते म्हणाले.
याचबरोबरच उपमुख्यमंत्री पवार यांनी 6 मार्च रोजी पंतप्रधान मोदी पुणे दौर्यावर येणार असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा मान-सन्मान ठेवला गेला पाहिजे. पंतप्रधान देशाच्या कोणत्याही भागात जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाही पद्धतीने निवडून ते पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी पुणे दौर्यावर आल्यानंतर त्यांच्या कार्यक्रमात
पालकमंत्री म्हणून सहभागी होणार आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदी यांच्या पुणे दौर्यात सहभागी होण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे, मात्र त्यांची तब्येत पाहून ते निर्णय घेतील. पुण्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात सहभागी होतील, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.