विद्यापीठ कायद्यातील बदल मागे घेण्याची जोरदार मागणी
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारने लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे बदल करून विद्यापीठ कायदा असंवैधानिक पद्धतीने पारित केला आहे. त्यामुळे राज्य सरकारविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) वतीने सोमवारी (दि.28) मुंबई विद्यापीठात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
राज्य मंत्रिमडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये विद्यापीठाच्या स्वायतत्तेवर घाला घालत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर कोणतेही चर्चा होऊ न देता त्या निर्णयाचे कायद्यात रूपांतर करून राज्य सरकारने बदल केलेला विद्यापीठ कायदा पारित केला. विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे, हे स्पष्ट होते. या सर्व प्रकारांमुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासाळून विद्यार्थ्यांना अंधारात लोटण्याचे काम हे राज्य सरकार करीत आहे. असे म्हणत अभाविप कोकण प्रदेशाच्या वतीने झोपेच सोंग घेतलेल्या गेंड्याच्या कातडीच्या महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी अभाविपच्या वतीने मुंबई विद्यापीठात घंटानाद आंदोलन करण्यात आले.
अभाविपच्या वतीने ’विद्यापीठ स्वायत्तता बचाव आंदोलन’ हाती घेण्यात आले आहे. आंदोलना अंतर्गत अभाविप राज्यभरातील महाविद्यालयात स्वाक्षरी अभियान, तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन राबवत आहे. विद्यार्थ्यांनी या स्वाक्षरी अभियानास प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी केल्या.
गेली महिनाभर अभाविप महाराष्ट्र भरात महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले बदल मागे घ्यावे यासाठी आंदोलन करत आहे. स्वाक्षरी मोहीम, राज्यातील सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन या नंतर सुद्धा विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले बदल सरकारकडून रद्द करण्यात आले नाहीत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ करण्यात आलेले बदल त्वरित मागे घ्यावेत. अन्यथा अभाविप विद्यापीठांची स्वायत्तता अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र भरातून लाखो विद्यार्थ्यांचा मोर्चा घेऊन विधानभवनावर धडकेल, असा इशारा अभाविप कोकण प्रदेशमंत्री अमित ढोमसे यांनी या आंदोलनादरम्यान महाराष्ट्र सरकारला दिला.