अलिबाग ः प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 2) दुपारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. येत्या 24 तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी व खाडी किनार्यावरील तसेच डोंगर उतारावर असणार्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गुरुवारी पावसाचा जोर कमी होता. आजही सकाळी पावसाने काहीशी उघडीप दिली होती. मात्र दुपारी 2वाजल्यापासून पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर वाढत गेला. मुसळधार पावासाने जिल्ह्यातील नद्यांच्या पातळी दुपारनंतर वाढ होण्यास सुरवात झाली. कुंडलिका नदीने सायंकाळी सहाच्या सुमारास धोका पातळी ओलांडली. सावित्री नदीच्या पातळीतही वाढ झाली. अंबा आणि पाताळगंगा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. प्रादेशिक हवामान विभागाने उत्तर कोकणात अतीवृष्टीचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नदी किनार्यावरील गावांना तसेच संभाव्य दरडग्रस्त गावांना जिल्हा प्रशासनसाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी आठ वाजे पर्यंत संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 80.64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.दक्षिण रायगडात पावसाचा जोर होता. पोलादपूर येथे सर्वाधिक 185 मिमी , महाड 130 मिमी , माणगाव 102 मिमी , तळा येथे 101 मिमी पावसाची नोंद झाली.