पेण : प्रतिनिधी
महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे मंगळवारी पेण शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी तालुक्यातील पेण, दादर वरवणे, सापोली, हनुमानपाडा, वरसई, धावटे, वाशीनाका, रावे, वडखळ, आंबिवली, जिते, शिर्की या 15 बैठकांतील 1034 श्री सदस्यांनी 62 टन सुका व ओला कचरा केला गोळा केला.
पेण शहरातील तहसील व प्रांताधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे, फौजदारी व दिवाणी न्यायालय, एसटी बस स्थानक, रामवाडी बस स्थानक, एसटी विभागीय कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, रेल्वे स्टेशन, वैकुंठ धाम स्मशानभूमी परिसर तसेच पेण न्यायालय ते बस स्थानक, हनुमान मंदिर ते चावडी नाका, तहसीलदार कार्यालय ते म्हाडा कॉलनी, नंदिमाळ नाका, नगरपालिका चौक ते चिचपाडा, प्रायव्हेट हायस्कूल ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्मशानभूमी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा, रायगड बाजार ते चिंचपाडा, अंतोरे फाटा ते नगरपालिका चौक, एसटी बस स्थानक ते चावडीनाका, आदी ठिकाणी स्वच्छता करून 40 टन ओला 22 टन सुका असा एकूण 62 टन कचरा गोळा केला. हा कचरा 11 ट्रॅक्टर एक डंपर, 15 पिकअप व्हॅन,12 टम्पो यांच्या सहाय्याने शहराबाहेरील डम्पिंग ग्राउंड येथे जमा करण्यात आला.
श्री सदस्यांच्या या स्वच्छता अभियानात नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, आरोग्य निरीक्षक शिवाजी चव्हाण, आरोग्य कर्मचारी रमेश गुप्ता, गौतम मोरे, गणेश सारंगकर, नॅशनल हायवेचे उप मुख्यकार्यकारी अभियंता रवींद्र कदम, दुय्यम निबंधक सोनाली पिंपळे, मंडळ अधिकारी प्रकाश मोकल, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. अतुल भगत, परिचारिका गीता भौड, अस्मिता भगत, वनरक्षक निलेश वारडे, सोनाली वाळके, प्रियंका सापते यांच्यासह श्री सदस्य सहभागी झाले होते.