उरण ः वार्ताहर
उरण शहरात पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 3) शरण्या यु-डायरेक्टर पोस्टल सर्व्हिस नवी मुंबई विभाग यांच्या हस्ते झाले.
शहरातील कोटनाका येथील पोस्ट कार्यालय जीर्ण व मोडकळीस आल्याने हे पोस्ट कार्यालय काही महिन्यांपासून जेएनपीटी टाऊनशिप येथे स्थलांतरीत झाले होते. त्यामुळे उरण शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे उरण शहरातच पोस्ट ऑफिस व्हावे, अशी मागणी होत होती. याबाबत विमला तलाव गुड मोर्निंग कट्टा सदस्यांनी उरण तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिले होते. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन शहरातील गिरीराज अपार्टमेंट, तळमजला आनंदनगर, उरण-करंजा रोड येथे हे पोस्ट कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
पोस्ट कार्यालय उद्घाटनाच्या वेळी नवी मुंबई पोस्ट कार्यालयाचे वरिष्ठ अधीक्षक डॉ. अभिजित इचके, वाशी उपाधिक्षक सुनील पवार, पोस्टमास्टर प्रशांत म्हात्रे, जनसंपर्क अधिकारी नवी मुंबई किरण साळुंखे व उरणचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.