Breaking News

अलिबाग-रोहा रस्ता होणार सुसाट; चौपदरीकरणास शासनाची मंजुरी

अलिबाग : प्रतिनिधी

अलिबाग – रोहा रस्ता आता सुसाट होणार आहे. राज्य शासनाने या रस्त्याच्या चौपदरीकणास मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर पोयनाड – नोगोठणे रस्त्याच्या कामालादेखील मंजुरी देण्यात आली आहे. या कामांच्या निविदाही प्रसिध्द झाल्या असून लवकरच कामांना सुरुवात होईल, अशी माहिती भाजपचे अलिबाग – मुरुड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी अलिबाग येथे भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  दिली.

अलिबाग ते रोहा मार्गासाठी एकुण 229 कोटी 11 लाख रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. 84 किलोमीटर लांबीच्या या कामाची निविदा प्रसिध्द झाली आहे. अलिबाग ते रोहा, रोहा ते तळा आणि तळा ते साई असा हा मार्ग आहे. या मार्गाचे चौपदीकरण करण्यात येणार आहे. सिडकोचा  एकात्मिक औद्योगिक विकास प्रकल्प अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यात येणार आहे. यासाठी 40 गावांमधील 19 हजार हेक्टर जमिन संपादित केली जाणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगाने या संपुर्ण परिसरातील रस्त्यांची कामे वेगाने पुर्ण केली जाणार आहेत. हा मार्ग दिघी बंदराशी जोडला जाणार आहे. या मार्गात चार मोठे पुल, 27 छोटे पुल, 204 मोर्या बांधण्यात येणार आहेत,  असे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी यावेळी सांगितले.

पोयनाड ते नागोठणे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली होती. या रस्त्याची दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम लवकरच सुरु होणार आहे. 29 किलोमिटर लांबीच्या या कामासाठी 42 कोटी 74 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. या मार्गावरील 1 मोठा आणि 6 छोट्या पुलांचे नुतनीकरण केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. सारळ पुलाच्या कामासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली असून, त्यांनी पुढील आधिवेशनात याबाबत ठोस पावले उचलून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. जिल्ह्यातील महामार्गांबरोबर राज्यमार्गांची कामेही यामुळे मार्गी लागतील असा विश्वास मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप अलिबाग शहर अध्यक्ष सुनिल दामले, दर्शन प्रभू, परशुराम म्हात्रे, उदय काठे यावेळी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply