Breaking News

‘त्या’ साडेआठ कोटीच्या गोलंदाजाची आयपीएलमधून माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

किंग्ज इलेव्हन पंजाबने लिलावात 8.40 कोटी रुपये मोजून चमूत दाखल करून घेतलेल्या वरुण चक्रवर्तीने इंडियन प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी चक्रवर्तीला दुखापत झाली होती आणि त्यातून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे त्याला संपूर्ण आयपीएल स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

पंजाबने या महागड्या खेळाडूला आपल्या संघात 27 मार्चला झालेल्या सामन्यात संधी दिली होती. पंजाबचा हा सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध होता. या सामन्यात वरुणने 35 धावा देत एक बळी मिळवला होता. त्यानंतर या खेळाडूला एकही सामना खेळता आलेला नाही. कारण यानंतर पंजाबचा सामना चेन्नई सुपर किंग्स या संघाबरोबर होणार होता, पण या सामन्यापूर्वी या खेळाडूच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर वैद्यकीय तपासणीमध्ये बोटाला फ्रॅक्चर असल्याचे निष्पन्न झाले. ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यामुळे त्याला यापुढील आयपीएलच्या सामन्यांमध्ये खेळता आले नव्हते.

वरुण हा तमिळनाडूकडून रणजी क्रिकेट खेळतो. शाळेमध्ये असताना त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे वरुणने नववीमध्ये क्रिकेट खेळायचे सोडूनही दिले होते. त्यानंतर तो पाच वर्षे क्रिकेटपासून लांब होता. या पाच वर्षांमध्ये त्याने आर्किटेक्चरचा कोर्स पूर्ण केला. सहा वर्षांनी त्याने धूळ खात पडलेल्या आपल्या क्रिकेट किटला हात लावला आणि पुन्हा एकदा तो मैदानात उतरला. तमिळनाडू प्रीमिअर लीगमध्ये वरुण नावारूपाला आला. त्याने या लीगमध्ये नऊ बळी मिळवले. त्यानंतर विजय हजारे करंडकामध्येही त्याने चमकदार कामगिरी केली. किंग्स इलेव्हन पंजाबने दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात वरुण खेळेल, अशी संघाला अपेक्षा होती, मात्र त्याची प्रकृती सुधारलेली नाही. त्यामुळे त्याला घरी परतावे लागले होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply