Breaking News

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोंचा पनवेलमध्ये तीव्र निषेध

पनवेल : हरेश साठे
बेताल वक्तव्य करणारे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा पनवेल भाजपच्या वतीने रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 17) आंदोलन करून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. भिकेचे डोहाळे लागलेले पाकिस्तान कधीच सुधारायचे नाही. त्यामुळे ते अशा प्रकारची बेताल वक्तव्ये करीत आहेत. या बेशरम लोकांची तोंड बंद करण्यासाठीच हे निषेध आंदोलन केले असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या निषेध आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, शहर सरचिटणीस व माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत, राजश्री वावेकर, निता माळी, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, शहर खजिनदार संजय जैन, सरचिटणीस अमरीश मोकल, दक्षिण भारतीय सेल संयोजक माधुरी (श्रीनिवास) कोडरू, सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, उत्तर भारतीय सेल जिल्हा संयोजक जितेंद्र तिवारी, सुहासिनी केकाणे, आरती तायडे, अंजली इनामदार, स्नेहल खरे, डॉ. पूनम पाटील, ज्योती देशमाने, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर अध्यक्ष रोहित जगताप, युवा नेते केदार भगत, विजय म्हात्रे, सतीश पाटील, देवांशू प्रभाळे, गणेश शेटे, अक्षय सिंग, कमलाकर घरत पल्लवी पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पाकिस्तान हा देश अमेरिकेत झालेल्या 9/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनला आश्रय देणारा देश असल्याचे वस्तुनिष्ठ विधान भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले होते. हे विधान पाकिस्तानच्या जिव्हारी लागले असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्या निषेधार्थ पनवेल भाजपच्या वतीने आंदोलन करून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टोचा निषेध करण्यात आला. या वेळी बिलावल भुट्टो आणि पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी करीत भुट्टो यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार्‍या पाकिस्तानला जयशंकर यांनी फटकारले होते. भारताकडून करण्यात आलेल्या विधानाला उत्तर देताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीका केली होती. त्यामुळे भाजपच्या वतीने शनिवारी पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री भुट्टो यांचा निषेध करण्यात आला.
दहशतवादाचा बिमोड करण्याचा मुद्दा हा सर्वच जागतिक व्यासपीठांवर ऐरणीवर आहे. दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना प्रायोजित करणे, त्यांना आश्रय देऊन वित्तपुरवठा करणे यामध्ये पाकचा सहभाग असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पाकच्या परराष्ट्रमंत्र्यांचे असभ्य वक्तव्य हे पाकच्या अपयशाचे द्योतक आहे. न्यूयॉर्क, मुंबई, पुलवामा, पठाणकोट आणि लंडन ही शहरे पाकिस्तान प्रायोजित, समर्थित आणि भडकावलेल्या दहशतवादाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे जगभरात निर्यात होणारा ’मेक इन पाकिस्तान’ दहशतवाद थांबवावाच लागेल, अशी प्रतिक्रिया यावेळी निषेध व्यक्त करताना उमटली.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, जगाला एकत्र आणण्याचे तसेच अर्थव्यवस्था वाढवण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत, पण बिलावल भुट्टो झरदारी यांच्यासारखे लोक त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे काम करीत आहेत, मात्र पंतप्रधान मोदींचे व्यक्तिमत्त्व बेदाग आहे. पुढे बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी परराष्ट्रमंत्र्यांच्या बेताल विधानाबद्दल पाकिस्तानने जाहीर माफी मागायलाच हवी, अशी मागणीही केली.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply