आरोपीला 10 वर्ष कारावास
अलिबाग : प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला येथील विशेष व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 वर्ष कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनिकेत अनिल वाजेकर असे आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली.
आरोपी अनिकेत याची पीडित अल्पवयीन (वय 17) मुलीशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. त्यानंतर ओळख वाढत गेली. लग्न करण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिला अलिबाग तालुक्यातील नागाव, पनवेल तालुक्यातील शिरढोण आणि विरार येथे नेऊन तिच्या सोबत शाररिक संबध ठेवले. आरोपी अनिकेत याने आपली फसवणूक केल्याचे पीडित मुलीच्या लक्षात आल्यावर तिने अलिबाग पोलीस ठाण्यात अनिकेत वाजेकर याच्या विरोधात फिर्याद दाखल केली. आरोपीविरोधात बलात्कार व पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास जलदगतीने व्हावा म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी सोनाली कदम, पोलीस उपनिरीक्षक कावळे यांनी सहकार्य केले. हा गुन्हा 1 ऑक्टोबर 2018 ते 2021 या कालावधीत घडला.
तपास पूर्ण झाल्यानंतर अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले. शासकीय अभियोक्ता भूषण साळवी यांनी सरकार तर्फे युक्तिवाद करून आरोपी अनिकेत विरोधात सबळ पुरावे सादर केले. या खटल्यात शासकीय अभियोक्ता भूषण साळवी यांनी एकूण 10 साक्षीदार तपासले. फिर्यादी, यशोधरा जाधव, डॉ. प्रीती प्रधान, डॉ. प्रियाल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक कावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम यांची साक्ष महत्वाची ठरली. पैरवी महिला पोलीस शिपाई प्रियंका नागावकर, पोलीस हवालदार सचिन खैरनार, पोलीस शिपाई हंबीर यांचे सहकार्यदेखील मोलाचे ठरले. अशी माहिती पोलीस विभागाच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाने दिली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश शईदा शेख यांनी आरोपी अनिकेत यास दोषी ठरवून 10 वर्ष कारावास व 25 हजार रुपये दंड, तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.