महाड : प्रतिनिधी
तालुक्यातील कांबळे तर्फे बिरवाडी येथील एका विवाहित महिलेने हुंड्यासाठी छळ केला जात असल्याची तक्रार केल्यानंतर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात पीडित महिलेचा पतीसह सासू-सासरे व अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांबळे तर्फे बिरवाडी येथील चोवीस वर्षीय विवाहीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार लग्नानंतर दोन्ही मुलीच झाल्याने तसेच माहेरुन पैसे आणण्यासाठी पतीसह सासू, सासरे, मावस सासू, नणंद यांच्याकडून शारीरिक तसेच मानसिक छळ केला जात होता. पीडित महिलेचे वडील नथुराम दत्तात्रय मोरे यांनादेखील सासरच्या मंडळींनी शिवीगाळ व दमदाटी करीत मारहाण केली होती.
या प्रकरणी पीडित महिलेचा पती सुमित सुनील देशमुख याच्यासह सुनील खंडेराय देशमुख (वय 53), सुनिता सुनील देशमुख (वय 50), सिंधुबाई गेनबा पवार, सपना नारायण कोकाटे यांच्यावर महाड औद्योगिक पोलीस ठाण्यात भादवि कलम 498 अ, 352, 323, 324, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.