माणगाव : प्रतिनिधी
मयत इसमाच्या जागी तोतया इसम उभा करून तसेच त्याचे बनावट पॅनकार्ड तयार करून संगनमताने साखळेवाडी (ता. माणगाव) येथील जमिनीची विक्री करून फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड येथील उल्हास टुमणे यांचे काका अरविंद विश्वनाथ टुमणे व उल्हास शंकर टुमणे यांच्या नावे माणगाव तालुक्यातील साखळेवाडी येथे (सर्वे नं.56 क्षेत्र 5-20-0) जमीन आहे. त्यापैकी अरविंद विश्वनाथ टुमणे यांचा सन 2008 मध्ये मृत्यू झाला आहे. मात्र त्यांच्या जागी तोतया इसम उभा करून तसेच बनावट पॅनकार्ड तयार करून त्यांची ओळख हेच जमिनीचे मूळ मालक आहेत असे सांगून, मिलिंद चंद्रकांत फोंडके (वय 48, रा. निजामपूर ता. माणगाव), रवींद्र वसंत भोईर (वय 40), निसेल रवींद्र भोईर (वय 20, दोन्ही रा. नेरुळ, नवी मुंबई), नितीन चंद्रकांत फोंडके (वय 50, रा. निजामपूर, ता. माणगाव), केशव गोविंद ओक (रा. बामणगाव, ता. माणगाव), असिफ याकूब दळवी (रा. निजामपूर ता. माणगाव), सखाराम धोंडू मांडवकर (रा. भाले, ता. माणगाव) यांच्यासह एकूण नऊ आरोपींनी संगनमत करून साखळेवाडी येथील (सर्वे नं.56 क्षेत्र 5-20-0) जमिनीची विक्री केली. या व्यवहाराची 26 एप्रिल 2013 रोजी माणगाव येथील दुय्यम निबंधक कार्यालय नोंदणीही केली. या प्रकरणी यतीन उल्हास टुमणे (वय 49, रा. काकरतळे, ता. महाड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माणगाव पोलीस ठाण्यात नऊ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार श्री. भोजकर करीत आहेत.
नेरळमध्ये पाच घरफोड्या
कर्जत : नेरळ पोलीस ठाण्यात मागील दोन दिवसात पाच घरफोड्यांची नोंद करण्यात आली असून, त्यापैकी दोन घरफोड्या शहरातील मोडकनगर येथील तर एक बाजारपेठ भागातील आहे. एक घटना नेरळ पूर्व भागात तर दूसरी एक घटना ममदापूरच्या नवीन वसाहत भागात घडली आहे. मोडकनगर येथील मधू अपार्टमेंटमध्ये झालेल्या चोरीच्या घटनेत 4400 रुपयांचे चांदीचे दागिने लंपास करण्यात आले आहेत. तर त्याच भागातील श्री समर्थकृपा अपार्टमेन्टमधील एका घरातून 25 हजार 600 रुपयांचे सोन्या, चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. नेरळ टेपआळी भागातील दत्तकृपा रेसिडेन्शीमधील घरातून 32 हजार 900 रुपयांचे सोन्याचे दागिन, चांदीचे दागिने चोरीला गेले आहेत. ममदापूूर नवीन वसाहतीमधील डंकन अपार्टमेंटमध्ये बंद असलेल्या घरातून 63 हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत. नेरळ पूर्व भागातील गंगानगरमधील मातोश्री बंगला येथील घरातून नऊ हजार रुपयांची रोकड पर्समधून काढून चोरट्यांनी पोबारा केला आहे.