पुण्यात मेट्रोसह विविध उद्घाटन
पुणे : प्रतिनिधी
पुण्यात रविवारी (दि. 6) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे अनावरण, गरवारे ते आनंदनगर मेट्रोचे उद्घाटन आणि इ बस सेवेचे उद्घाटन असे कार्यक्रम झाले. त्यानंतर एमआयटीच्या प्रांगणात मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मोदींनी काँग्रेसला टोला लगावला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात भूमीपूजन होत होते. पण तो प्रकल्प कधी पूर्ण होईल हे समजत नसे. वेळेवर प्रकल्प पूर्ण होऊ शकतो, हे मेट्रोने दाखवून दिले असल्याचे सांगून त्यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली आहे. आज बारापेक्षा जास्त शहरात मेट्रो काम चालू आहे. त्यात महाराष्ट्र जास्त आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक इकडे मेट्रो सुरू होतेय. लोकांना आग्रह जे मोठे लोक समाजात आपण मानतो त्यांना आग्रह की मेट्रो प्रवास सवय लावा जेवढा जास्त मेट्रो प्रवास तेवढी शहराला मदत होईल. तसेच जास्तीत जास्त ई वाहतूक सुरू झाली पाहिजे असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आहे. एमआयटी महाविद्यालय मैदानावर आयोजित विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उषा ढोरे आदी उपस्थित होते.मोदी पुढे म्हणाले, पुणे मेट्रो पुण्यातील वाहतूक व्यवस्थेला मजबूत करेल. जनतेला गर्दी आणि वाहतूकीच्या खोळंब्यापासून मुक्त करेल. पुण्यातील जनतेचे जीवनमान अधिक सुखकर करेल. कोरोना संकटकाळातही मेट्रो प्रकल्पाचा एक टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. पुणे मेट्रोसाठी सौर ऊर्जेचाही मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. त्यामुळे दरवर्षी 25 हजार टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल. या प्रकल्पासाठी कामगारांनी दिलेले योगदान सामान्य माणसासाठी उपयुक्त ठरेल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिका येथे करण्यात आले. या पुतळ्याची उंची सुमारे 9.5 फूट आहे.
विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ आणि पायाभरणी
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते बालेवाडी येथे बांधण्यात आलेल्या आरके लक्ष्मण आर्ट गॅलरी, 140 ई-बस आणि बाणेर येथील ई-बस डेपोचेही लोकार्पण आणि मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन आणि मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. मुळा-मुठा नदीच्या 9 किलोमीटरच्या पट्ट्यात नदीचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. यामध्ये नदीकाठचे संरक्षण, सांडपाणी व्यवस्थापन (इंटरसेप्टर सीवेज नेटवर्क), सार्वजनिक सुविधा, नौकाविहार सुविधा इत्यादी कामांचा समावेश असेल.
देशात वेगाने शहरीकरण होत आहे. 2030 पर्यंत शहरी लोकसंख्या 60 कोटीपेक्षा अधिक होईल. शहराची वाढती लोकसंख्या संधी निर्माण करण्यासोबत आव्हानेही निर्माण करते. शहराच्या विस्तारासोबत रस्ते वाहतूकीला मर्यादा येतात. अशावेळी सार्वजनिक वाहतूक सुविधेचा विकास हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा वाहतूक सुविधांवर आणि विशेषत: मेट्रो प्रकल्पावर विशेष लक्ष देत आहे.
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान