Breaking News

खासदार शरद पवार यांच्याकडून लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कौतुक

पुण्यात श्रीनिवास पाटील व मधुकर भावे यांचा कृतज्ञता सन्मान

पुणे : प्रतिनिधी

खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी वयाची 81 वर्षे पूर्ण करून 82व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेतर्फे शनिवारी (दि. 5) पुण्यात आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा विद्यमान खासदार शरद पवार यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या कार्यक्रमात खासदार शरद पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक कार्यात रामशेठ ठाकूरांची साथ असते, असे म्हणत लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याविषयी कौतुकोद्गार काढले. खासदार शरद पवार म्हणाले की, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण ते अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मले होते. नवी मुंबईतील जेएनपीटीच्या सगळ्या परिसरामध्ये जी अनेक कष्टकरी आणि गरीब कुटुंबं होती त्यात रामशेठ जन्मले. अतिशय चिकाटीने आणि कष्टाने पुढे आले. सुदैवाने त्यांना व्यवसायात यश आले. पण त्या यशाचा वाटा आपण समाजाला दिला पाहिजे, हे सूत्र त्यांनी नेहमी पाळले. रयत शिक्षण संस्थेमार्फत एखादा नवीन प्रकल्प हाती घेतला की, त्याला रामशेठ ठाकूरांचा नेहमी पाठिंबा असायचा. शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक कार्यात रामशेठ ठाकूरांची साथ नेहमी असायची. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्या काळामध्ये ’कमवा आणि शिका’ योजना काढली. कर्मवीरांची हीच शिकवण अंगिकारून रामशेठ ठाकूर आज इथपर्यंत आले आहेत. ते देशाच्या लोकसभेमध्येदेखील होते. आज त्यांचे चिरंजीव विधानसभेत आहेत. ठाकूर अनेक काळापासून सहकार क्षेत्रामध्ये काम करत आहेत. याचा मला आनंद आहे. ते पुढे म्हणाले की, थेट सिक्कीमच्या राज्यपाल पदापर्यंत मजल मारलेला माझा मित्र श्रीनिवास याच्या माझ्यावर असलेल्या प्रेमात मला यत्किंचीतही फरक आढळून येत नाही. मधुकर भावेंनीदेखील आचार्य अत्रेंवर नितांत श्रद्धा ठेवून पत्रकारिता क्षेत्रात एक शिखर गाठले. आज सत्कार करण्यात आलेल्या या दोन्ही सत्कारार्थींनी त्यांच्या श्रद्धा स्थानावर आणि मैत्रीवर जी अढळ निष्ठा दाखवली, त्यामुळे ते या उंचीपर्यंत येऊ शकले. अशा विविध प्रसंगामधून ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी खासदार श्रीनिवास पाटील आणि ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांच्या व्यक्तीमत्वांचे अंतरंग उलगडले. या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. डी. वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, उपाध्यक्ष रवींद्र डोमाळे, सुनील महाजन आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply