अलिबाग : प्रतिनिधी
चूल आणि मूल या मानसिकतेतून बाहेर पडून महिलांनी आज स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ही ओळख त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे. अशा कर्तृत्ववान महिला इतरांसाठीही प्रेरणादायी आहेत, असे मत रायगड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे यांनी अलिबाग येथे व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अलिबाग प्रेस असोसिएशनने सोमवारी (दि. 7) आदर्श पतसंस्थेच्या सभागृहात कर्तृत्ववान महिलांचा तेजस्विनी पुरस्कार देऊन सन्मान केला. या पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. फणसे बोलत होत्या. रायगडच्या उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस अधीक्षक किर्ती शेडगे, आदर्श पतसंस्थेच्या संचालिका वर्षा शेठ, अध्यक्ष सुरेश पाटील आणि अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर कार्यक्रमाला उपस्थितीत होते. त्यांच्या हस्ते महिलांना सन्मानित करण्यात आले. महिलांना शिवणकामाचे धडे देऊन स्वावलंबी बनविणार्या रेखा प्रभाकर मोरे, गणेशमूर्ती कार्यशाळा चालविणार्या सपना अमोल जाधव, साऊंड सर्व्हिस व्यवसायात जम बसवणार्या स्नेहा गणेश कादू, क्रिकेटपटू श्रृती संतोष अडीत आणि दुग्ध व्यवसाय करणार्या वर्षा साखरकर यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.