सलग दुसर्यांदा बहुमताने केंद्रात सत्तेवर आलेले मोदी सरकार मिळालेल्या संधीचे सोने करीत आहे. ज्या जनतेने आपल्याला भरभरून कौल दिला त्या सर्व घटकांना आवश्यक सोयीसुविधा पुरवून त्यांचे जीवन सुकर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी करीत आहेत. पुण्यातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन त्याचाच एक भाग आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्या पुणे नगरीसाठी रविवारचा दिवस ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखाच म्हटला पाहिजे. या एकाच दिवसात पुणेकरांना खूप काही मिळाले. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुण्यात मेट्रो रेल्वे धावली असून या प्रकल्पातील गरवारे महाविद्यालय ते वनाज आणि पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या दोन मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे पुण्यातील मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्याच हस्ते झाले होते. अशा प्रकारे पंतप्रधान आणि त्यांच्या सरकारने प्रकल्पपूर्ती केली आहे. पंतप्रधानांनी स्वत: तिकिट काढून मेट्रोमधून प्रवासही केला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना वाहतुकीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाला आहे. आपल्या देशात वेगाने शहरीकरण होत आहे. 2030पर्यंत शहरी लोकसंख्या 60 कोटींपेक्षा अधिक होईल. शहराची वाढती लोकसंख्या संधी निर्माण करण्यासोबत आव्हानेही निर्माण करते. शहराच्या विस्तारासोबत रस्ते वाहतूकीला मर्यादा येतात. अशा वेळी सार्वजनिक वाहतूक सुविधेचा विकास हाच सर्वोत्तम पर्याय आहे. त्यामुळे केंद्र सरकार अशा वाहतूक सुविधांवर आणि विशेषत: मेट्रो प्रकल्पावर विशेष लक्ष देत आहे, असे या वेळी पंतप्रधान मोदींनी नमूद केले. आज देशांतील दोन डझनपेक्षा अधिक शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आदी ठिकाणी मेट्रो रेल्वेचा विस्तार होत आहे, असेही त्यांनी सांगितले. मेट्रोसेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासोबतच पुणे महापालिकेच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण, मुळा-मुठा नदी सुधार आणि मुळा-मुठा नदीकाठ पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन तसेच विजेवर धावणार्या (ई-बस) 140 गाड्यांचे आणि ई-बस आगाराचे लोकार्पण, व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. यामुळे आगामी काळात पुण्याचे रूपडेच पालटणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आल्यापासून विविध प्रकल्प आकारास येत आहेत. पूर्वी प्रकल्पाचे उद्घाटन होत असे, मात्र तो प्रकल्प पूर्ण होईल की नाही याची शाश्वती नसे. गंभीर म्हणजे अनेक वेळा गैरव्यवहार होऊन तो प्रकल्प एकतर गुंडाळला जाई किंवा तसाच पडून राहत असे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर हे चित्र बदलले. प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावेत यासाठी पीएम गती-शक्ती राष्ट्रीय बृहत् आराखडा केंद्र सरकारने तयार केला आहे. विकासाचा बॅकलॉग भरून काढत नागरिकांना विविध सोयीसुविधा देण्याचा चंग मोदी सरकारने बांधला आहे. यामध्ये विरोधकांनी कितीही अडथळे आणले तरी हे सरकार थांबणार नाही. विकासाचे चक्र देशात अविरतपणे सुरूच राहणार असून त्यातून देश आणि देशवासीयांच्या प्रगती व विकासात भर पडणार हे नक्की!
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …