संजय राऊतांना किरीट सोमय्यांचे सडेतोड उत्तर
मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी (दि. 8) पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या त्यांचे वाधवान यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्याला सडेतोड उत्तर देत किरीट सोमय्या यांनी, माझा वाधवान यांच्याशी काहीही संबंध नसून पुरावे असल्याशिवाय मी बोलत नाही. त्यामुळे संजय राऊत हे दररोज फक्त नवनवीन नाटकं करीत असल्याचा टोला यावेळी त्यांनी लगावला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय नाट्यामुळे वातावरण ढवळून निघाने आहे. त्यात अधिवेशन सुरू असल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून दररोज नवनवीन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच, त्यांना ईडीचे पाचवे एजंट अशी टीकादेखील केली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांनीही त्वरीत पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे.
वाधवान यांच्यासोबत किरीट सोमय्या यांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला. त्याबाबत काही संदर्भांचा उल्लेख करतानाच, हे सर्व पुरावे पंतप्रधान कार्यालयाला पाठवणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र माझा वाधवान यांच्याशी काहीही संबंध नाही. राऊतांना मुंबई पोलिसांनी उत्तर दिलेले आहे. मी अधिकृत पुराव्याशिवाय कोणतीही गोष्ट बोलत नाही. त्यामुळे संजय राऊत यांनी आपली नाटकं बंद करावीत, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांवरही साधला निशाणा
उद्धव ठाकरे, संजय राऊतांनी सांगितलं की, नवाब मलिक मुस्लीम आहेत म्हणून त्यांना अटक केली. आता उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला नाही, तर आता उद्धव ठाकरे याबाबत काय बोलणार आहेत? 19 बंगल्यांबाबत मुख्यमंत्री का बोलत नाहीत? असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.