Breaking News

शेकापला धक्का; कार्यकर्ते भाजपमध्ये

भाजपमुळेच मुरूड तालुक्याचा विकास होणार -अ‍ॅड. महेश मोहिते

मुरूड : प्रतिनिधी

राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपचेच आहेत. भाजप खर्‍या अर्थाने मुरूड तालुक्याच्या विकासाला प्राधान्य देत असून, त्यामुळे कधी नव्हे इतका विकास झालेला मुरूडची जनता पाहणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी बुधवारी (दि. 4) येथे केले.

भाजप पदाधिकारी अनिल नांदगावकर यांच्या निवासस्थानी बुधवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात उसरोली येथील ग्रामस्थांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या वेळी अ‍ॅड. महेश मोहिते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. भाजपमुळेच मुरूड तालुक्याचा विकास होणार असल्याचा दावा त्यांनी या वेळी केला.

मुरूड तालुक्यातील काशीद येथे करोडो रुपये खर्च करून रो रो सेवा व वाहनतळ विकसित होणार असून, त्यामुळे पर्यटनाला चालना मिळून स्वयंरोजगाराला मोठी संधी प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे एमएमआरडीएचे क्षेत्र साळाव ते तळेखार क्षेत्रात विकसित होणार आहे. दिघी पोर्ट हे लवकरच जेएनपीटीला हस्तांतरित होणार असून यामध्ये प्रथम नोकर्‍यांची संधी स्थानिकांना मिळणार आहे, अशी माहिती अ‍ॅड. महेश मोहिते यांनी या वेळी दिली.

भाजपच्या कार्यप्रणालीने प्रभावित होऊन उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील अनेक वर्षे शेकापसोबत राहिलेल्या परीट समाज बांधवांनी तसेच पंढरीनाथ ठाकूर कुटुंबीयांनी या वेळी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनी भाजपत स्वागत केले. या वेळी भाजपचे मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, उपाध्यक्ष महेश मानकर, अल्पसंख्याक मोर्चाच्या उलडे दीदी, अनिल नांदगावकर, सुनील खोत, कृष्णा किंजले, हनीफ उलडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

यांनी केला भाजपमध्ये प्रवेश मुरूडमध्ये बुधवारी झालेल्या कार्यक्रमात पंढरीनाथ ठाकूर, अशोक ठाकूर, शैलेश ठाकूर, नितेश ठाकूर, उदय ठाकूर, गणेश ठाकूर, महेश ठाकूर, आदेश गिरणेकर, कृष्णा घोसाळकर, चंद्रकांत नांदगावकर, सूर्यकांत नांदगावकर, संतोष नांदगावकर, नथुराम नांदगावकर, रोहिदास नांदगावकर यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply