मच्छीमारांना नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ
उरण ः प्रतिनिधी
न्हावा-शिवडी सी लिंक प्रकल्पाचे काम सुमारे 70 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले असले तरी बाधित असलेल्या न्हावा आणि न्हावाखाडी येथील 789 स्थानिक मच्छीमारांना अद्यापही नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या या ग्रामस्थांनी येत्या 14 मार्चपासून ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुरू असलेल्या सी लिंक प्रकल्पाचे काम बेमुदत बंद पाडण्याचा निर्वाणीचा इशारा पत्रकार परिषदेतून दिला आहे. या पत्रकार परिषदेला न्हावा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत भोईर, सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, उपसरपंच मंजुषा ठाकूर, सदस्य सागर ठाकूर, किसन पाटील, प्रल्हाद पाटील, देवेंद्र भोईर, विजया ठाकूर, निर्मला ठाकूर, कल्पना घरत, माजी सरपंच हनुमान भोईर, माजी अध्यक्ष आशिष पाटील, संजय ठाकूर, राकेश पाटील, जयंत पाटील, सामाजिक कार्यकर्ते राम मोकल, सुजित ठाकूर, प्रकाश कडू, हनुमंत आदी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उर्वरित बाधित मच्छीमारांना एमएमआरडीएकडून आर्थिक नुकसानभरपाईची रक्कम देण्यात टाळाटाळ केली जात आहे. वारंवार पत्रव्यवहार, निवेदन, चर्चा, बैठकांनंतरही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. एमएमआरडीएकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीय ग्रामस्थांनी न्हावा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील 789 बाधित मच्छीमारांना जोपर्यंत आर्थिक नुकसानीची रक्कम दिली जात नाही तोपर्यंत न्हावा-शिवडी सी लिंकचे काम 14 मार्चपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती ग्रामस्थांनी या वेळी पत्रकार परिषदेतन दिली.